
>> अरूण
नीट वाचलंत ना? वडासांबार नव्हे. वड-संभार, म्हणजे एका महाकाय वटवृक्षाचा व्याप किंवा पसारा. जगात असे वाढत जाणारे आणि पारंब्यांचे जग पसरत जाणारे अनेक वड असतीलच. एकेकाळी मुंबईसारख्या शहरातही सूर-पारंब्या खेळता येण्याइतपत विस्तारलेले, पारंब्यांचा झोपाळा करता येणारे मोठमोठे वटवृक्ष होते. आजही आमच्या राजावाडीतला तो वड तसाच आहे. फक्त त्यावर सूरपारंब्या खेळण्याचा काळ सरला.
पुढे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात शहरीकरणाचा वेग वाढू लागला. नव्वदच्या दशकानंतर त्याला गती आली. नंतर तर पर्यावरण की विकास? असे प्रश्न निर्माण करत अनिर्बंध जंगलतोडीकडे अवघं जगच जाऊ लागलं. त्या ‘उजाड‘पणाचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतायत… पण ‘डिफारेस्टेशन’कडे दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमुळे अरण्ये नष्ट होतायत. काही कोटी झाडं (रोपं) लावली तरी हजारो वर्षांत नैसर्गिक प्रक्रियेने निर्माण झालेलं पाच-पन्नास वर्षांत तयार करता येत नाही. वटवृक्षासारखे मोठे डेरेदार वृक्ष पूर्णत्वाला जायला तर शेकडो वर्षांचा कालावधी लागतो.
या परिस्थितीतही काही वटवृक्ष आपला वड-संभार टिकवून आहेत. आजच्या घडीला, हिंदुस्थानात थिम्माम्मा मारीमानू या आंध्र प्रदेशातील भागात जगातला सर्वाधिक पारंब्या आणि फांद्यांनी विस्तारलेला वड अस्तित्वात आहे. आंध्रच्या अनंतपूर जिह्यामधला हा महाकाय वड तब्बल पाच एकर किंवा 21000 चौरस मीटर जागा व्यापून आहे! या प्राचीन वटवृक्षाचं वय सुमारे 550 वर्षांचं असून त्याला सुमारे 4000 पारंब्या लटकलेल्या दिसतात. पारंब्या म्हणजे वडाची लोंबती मुळंच असतात. ती जमिनीत रुजून वडाचं झाड जमीन ‘मुलाक्रांत’ (पादाक्रांत म्हणतो तसं) करत विस्तारत जातं.
यापूर्वी आम्ही ज्याच्याविषयी ऐकत आलो आणि कोलकात्याजवळच्या हावडा येथील ‘जगदीशचंद्र बोस इंडियन बोटॅनिक गार्डन’मध्ये कुणालाही पाहता येतो तो 250 वर्षे वयाचा आणि 4.60 एकर जागेत पसरलेला वटवृक्ष. तोच कधीकाळी जगातला सर्वाधिक व्याप्तीचा ‘वड-संभार’ असलेला महावड होता. परंतु 1925 मध्ये त्याची किडलेली मुळं छाटण्यात आली आणि विस्तार कमी झाला. अशा या वडांची ‘लागवड‘ करण्याचं व्रत घेतलेल्या आजीबाई पद्मश्री गौरवप्राप्त थिमाक्का यांच्याविषयी पुढील लेखात.



























































