अंतराळाचे अंतरंग – परग्रहावरील वनस्पती हिरव्याच असतील का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुजाता बाबर

उत्क्रांतीच्या नियमानुसार जीव आपल्या पर्यावरणाशी जुळवून घेतात. त्यानुसारच दुसऱ्या ग्रहावर जीवन उक्रांत झाले तर त्याची रचना आणि रंग पृथ्वीवरील जीवनापेक्षा अगदी वेगळे असू शकतात.

पृथ्वीवर नजर टाकली की, आपल्याला सर्वत्र हिरवा रंग दिसतो. झाडांची पाने, गवत, शेवाळ आणि असंख्य वनस्पती! या हिरव्या रंगामागे आहे हरितद्रव्य, जे सूर्यप्रकाशातील ऊर्जा वापरून प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे तयार होते. त्यामुळे आपल्या मनात सहज प्रश्न येतो, जर विश्वातील एखाद्या ग्रहावर वनस्पतींसारखे जीव असतील, तर तेही हिरवेच असतील का? खगोलजीवशास्त्रातील संशोधन सांगते की, असे असणे आवश्यक नाही. परग्रहावरील जीवनाचा रंग तेथील तारा आणि त्याच्या प्रकाशावर अवलंबून असू शकतो.

पृथ्वीवरील वनस्पती सूर्याच्या प्रकाशातील लाल आणि निळ्या तरंगलांबींची ऊर्जा मोठ्या प्रमाणावर शोषून घेतात, तर हिरवा प्रकाश तुलनेने अधिक परावर्तित करतात. म्हणून पाने आपल्याला हिरवी दिसतात, पण परग्रहावरील जीवनाला मिळणारा प्रकाश पृथ्वीवरील सूर्यप्रकाशासारखाच असेल याची खात्री नाही.

विश्वातील अनेक तारे सूर्यापेक्षा वेगळे आहेत. काही तारे अधिक उष्ण आणि निळसर प्रकाश देतात, तर काही तुलनेने थंड असून लाल किंवा अवरक्त किरणे अधिक प्रमाणात उत्सर्जित करतात. विशेषत लाल बटू तारे विश्वात अत्यंत सामान्य आहेत. त्यांच्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांवर जीवनासाठी योग्य परिस्थिती असेल, तर तेथील प्रकाश संश्लेषण करणाऱ्या जिवांना उपलब्ध होणारी ऊर्जा पृथ्वीपेक्षा वेगळी असेल.

अशा परिस्थितीत तेथील जिवांना प्रकाश शोषण्यासाठी वेगवेगळ्या रंगद्रव्यांची आवश्यकता भासू शकते. उदाहरणार्थ, लाल किंवा अवरक्त प्रकाश अधिक उपलब्ध असेल, तर तेथील प्रकाश संश्लेषण करणाऱ्या जिवांमध्ये त्या तरंगलांबींचे विकिरण शोषून घेणारी रंगद्रव्ये विकसित होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या पृष्ठभागाचा रंग जांभळा, लाल, तपकिरी किंवा अगदी काळसर दिसण्याची शक्यता सैद्धांतिकदृष्ट्या नाकारता येत नाही.

यामागे उत्क्रांतीचा साधा नियम काम करतो. जीव आपल्या पर्यावरणाशी जुळवून घेतात. पृथ्वीवरही प्रकाश संश्लेषण करणारे सर्व जीव हिरवे नाहीत. काही शैवाल आणि सूक्ष्मजीव लाल, तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे असतात. त्यांच्या रंगामागे वेगवेगळी प्रकाशशोषक रंगद्रव्ये असतात. त्यामुळे दुसऱ्या ग्रहावर जीवन उक्रांत झाले तर त्याची रचना आणि रंग पृथ्वीवरील जीवनापेक्षा अगदी वेगळे असू शकतात.

याहूनही महत्त्वाचे म्हणजे खगोलशास्त्रज्ञ आता परग्रहांवर जीवन शोधताना केवळ पाणी किंवा वातावरणातील वायूंचाच शोध घेत नाहीत. एखाद्या ग्रहाच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणावर प्रकाश संश्लेषण करणारे जीव असतील, तर त्यांच्या रंगद्रव्यांमुळे ग्रहाच्या परावर्तित प्रकाशात विशिष्ट बदल दिसू शकतो. पृथ्वीवरील वनस्पतींच्या बाबतीत ‘रेड एज’ (red edge) म्हणून ओळखला जाणारा एक प्रकाशीय संकेत दिसून येतो. भविष्यातील अधिक शक्तिशाली दुर्बिणी अशा वैशिष्ट्यांचा दूरून शोध घेऊ शकतील.

मात्र येथे एक मोठे आव्हान आहे. एखाद्या ग्रहाचा रंग पाहून तेथे जीवन आहे, असा थेट निष्कर्ष काढता येणार नाही. खनिजे, वातावरणातील रासायनिक प्रक्रिया किंवा इतर निर्जीव घटकही विशिष्ट रंग निर्माण करू शकतात. त्यामुळे संभाव्य जीवनाचा पुरावा मिळवण्यासाठी प्रकाशातील संकेतांसोबत वातावरणाची रासायनिक रचना, ग्रहाचे तापमान आणि त्याची इतर वैशिष्ट्ये यांचाही अभ्यास करावा लागेल.

भविष्यात एखाद्या दूरच्या ग्रहाच्या प्रकाशात वैज्ञानिकांना हिरव्या नव्हे तर जांभळ्या किंवा गडद लाल रंगाची विशिष्ट खूण दिसली आणि त्यासोबत जीवनाशी संबंधित रासायनिक संकेतही आढळलेत अशी कल्पना करा! तो क्षण मानवाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या शोधांपैकी एक ठरेल.

म्हणून परग्रहावरील वनस्पती हिरव्याच असतील, असे मानण्याचे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. हिरवा रंग हा जीवनाचा नियम नाही, तो पृथ्वीवरील उत्क्रांतीचा एक परिणाम आहे. विश्वातील वेगळ्या ताऱ्यांच्या प्रकाशाखाली जीवनाने वेगळे रंग, वेगळी रसायने आणि कदाचित आपल्या कल्पनेपलीकडील जैविक रूपे धारण केली असतील. कदाचित भविष्यातील दुर्बिणी आपल्याला दूरच्या जगांकडे पाहताना एक असा रंग दाखवतील, जो आजपर्यंत मानवाने कधीही पाहिलेला नाही आणि त्या रंगामागे परग्रहावरील जीवनाची पहिली खूण दडलेली असेल. त्यामुळे त्यांचा रंग हा केवळ सौंदर्याचा विषय नसून, त्या ग्रहाचे वातावरण, ताऱ्याचा प्रकाश आणि तेथील जीवनाच्या उत्क्रांतीचा महत्त्वाचा संकेत ठरू शकतो.

[email protected]

(लेखिका खगोल अभ्यासक आहेत.)