
महाराष्ट्राच्या मागील पिढ्यांनी दुष्काळ पाहिला; मात्र येणाऱ्या पिढ्यांना दुष्काळ पाहावा लागू नये, यासाठी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यातून महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.
महाराष्ट्र देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य असून पहिल्या सहामाहीतील राज्याचा आर्थिक विकासदर जवळपास 8.8 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हा विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असून आतापर्यंत जवळपास 13 जिह्यांनी निर्धारित लक्ष्य पूर्ण केले आहे. गडचिरोली, पालघर, नंदुरबार यांसह राज्यातील प्रत्येक भागात विकास पोहोचविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्यातील शेतकऱयांना सध्या 76 टक्के दिवसा वीज मिळत आहे. पुढील वर्षभरात 100 टक्के शेतकऱयांना दिवसा वीज देण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येईल. महिला शेतकरी कायदा तयार करून महिलांना शेतकऱयाचा दर्जा देण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कर्तव्यांचे भान ठेवून तिरंगा सदैव उंच ठेवण्याचा संकल्प
संविधानाने नागरिकांना अधिकार दिले आहेत, त्याचबरोबर कर्तव्यांची जाणीवही करून दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी सर्व नागरिकांनी आपल्या कर्तव्यांचे भान ठेवून देशाचा तिरंगा सदैव उंच राहील, असा संकल्प करावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.



























































