
अरुणाचल प्रदेशात दोन दिवसांपासून अतिशय मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच दिबांग घाटी जिह्यात अचानक झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या पुरात हिंदुस्थानी लष्कराचे 5 जवान वाहून गेले असून ते बेपत्ता आहेत. तर अप्पर सुबनसिरी जिह्यात एका रस्ते बांधकामाच्या प्रकल्पावर दरड कोसळल्यामुळे 4 मजुरांचा मृत्यू झाला आहे. अनेक मजूर या ठिकाणी ढिगाऱयाखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, दोन्ही घटना शक्रवारी रात्री उशिरा घडल्या. त्यासंदर्भात आज माहिती उघडकीस आली. दिबांग घाटी जिह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी रात्री पावसाचा जोर अचानक वाढला. त्यानंतर या भागात ढगफुटीमुळे मोठा पूर आला. पुसू पाणी लष्करी छावणीत 5व्या ग्रनेडिअर तुकडीचे काही जवान तैनात आहेत. अचानक आलेल्या पुरात लष्कराचे दोन निवारा तंबू वाहून गेले. डय़ुटी झाल्यानंतर जवानांच्या निवासासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. त्यातील सात जवान वाहून गेले. त्यापैकी दोघांना वाचवण्यात आले, मात्र पाच जवान बेपत्ता आहेत. उपेंद्र, ुंदन, विनोद, आदित्य आणि समुंदा अशी त्यांची नावे असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी आयटीबीपी आणि जनरल रिझर्व्ह इंजिनीअर फोर्सच्या पथकांची मदत घेण्यात येत आहे. याशिवाय अरुणाचलचे पोलीस आणि काही स्थानिकांचीही मदत घेतली जात आहे.
दरड कोसळून चार मजुरांचा मृत्यू
अप्पर सुबनसिरी जिह्यातील ‘केओजारिंग-बायचिंग’ या रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठी दरड कोसळली. त्यात तादू बाकी, ताजी राय, माकांश बसुमतारी आणि बाबूल अली या चार मजुरांचा मलब्याखाली दबून मृत्यू झाला. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून इतरांचा शोध सुरू आहे. मुसळधार पावसामुळे स्थानिक नागरिकांना आणि प्रवाशांना डोंगराळ भागात प्रवास करताना सतर्क राहण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
























































