
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लोकसभेत वादग्रस्त टिप्पणी केल्याच्या तक्रारीनंतर लोकसभा सचिवालयाने नोटीस पाठवली आहे.
पेपरफुटीविरोधी विधेयकावर चर्चा करताना 29 जुलै रोजी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढवला होता. त्यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना धारेवर धरत लोकसभेत उत्तर देण्याचे आव्हान दिले होते. या वेळी राहुल गांधी यांनी इडियट आणि अंधभक्त अशा शब्दांचा वापर केला होता. एका विद्यार्थिनीसोबत झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना राहुल गांधी यांनी हे शब्द वापरले. त्या वेळी बराच गदारोळ झाला होता. यासंदर्भात भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि मुख्य प्रतोद संजय जयस्वाल यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राहुल गांधी यांची तक्रार केली होती. लोकसभा अध्यक्षांनी वादग्रस्त शब्दांना कामकाजातून हटविण्याचे आदेश दिले होते.
राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपकडून दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर 28 ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे.



























































