पर्यटकांसाठी 45 ठिकाणी रोप वे, गडकिल्ले, मंदिरे आणि लेणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजने अंतर्गत राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर 45 रोप वे बांधण्यात येणार आहेत. त्यात महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने 15 रोप वे उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये किल्ले रायगड, कुलाबा किल्ला, घारापुरी लेणी आदींचा समावेश आहे. यामुळे राज्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळांचे महत्त्व वाढून पर्यटनाला चालना मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या रस्ते  परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडून राष्ट्रीय रोप वे पर्वतमाला कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत डोंगराळ प्रदेश, धार्मिक आणि ऐतिहासिक व दुर्गम भागांना रोप वेच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत राज्य सरकारच्यामार्फत 16 तर केंद्राच्या नॅशनल लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडमार्फत (एनएचएमएल) 29 रोप वे उभारण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारची ‘एनएचएमएल’ व राज्य सरकारमध्ये सामंजस्य करारही झाला आहे. या प्रकल्पांसाठी राज्य सरकारच्या वतीने जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या खर्चास वित्त विभागाची मान्यताही मिळाली आहे. राज्यातील रोप वे प्रकल्प एनएचएमएलमार्फत करण्यासाठी आवश्यक समभाग भांडवली मदत आणि जमीन उपलब्ध करून देण्याच्या दोन्ही पर्यायांना मान्यता देण्यात आली आहे. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अलीकडेच रोप वेच्या प्रकल्पाचा आढावा घेतला.

शिवप्रेमींना दिलासा

किल्ले रायगडावर जाण्यासाठी सध्या खासगी रोप वेचा पर्याय आहे. हा रोप वे जुना झाला आहे. राज्य सरकारच्या वतीने उभारण्यात येणाऱया या प्रकल्पामुळे रायगडावर जाण्यासाठी अजून एका रोप वेच पर्याय शिवप्रेमींना उपलब्ध होणार आहे. पुरातत्व विभागाकडून नवीन शासकीय रोप वे उभारण्यास मान्यता मिळाली आहे.