
मुंबईतील मोठय़ा भूखंडांवर समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात वांद्रे पूर्वेतील बेहरामपाडा, अंधेरीतील मजासवाडी आणि ओशिवरा येथील बेहराम बाग या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. तसेच या प्रकल्पांना गती देण्यासाठी एमएमआरडीए, म्हाडा आणि सिडको यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने संयुक्त भागीदारीच्या तत्त्वावर काम करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय आणि नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे आयोजित ‘रिइमॅजिनिंग अपर्ह्डेबल हाउसिंग – फ्रॉम स्कीम टू सस्टेनेबल इकोसिस्टम’ या परिषदेत महेंद्र कल्याणकर बोलत होते. एमएमआरचा ‘ग्रोथ हब’ म्हणून विकास करण्याच्या दृष्टीने एसआरएने 2030 पर्यंत 5 लाखांहून अधिक पुनर्वसन घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे,असेही ते म्हणाले.





























































