बार काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी मागितली विद्यार्थ्यांची माफी, सरन्यायाधीशांनी फटकारल्यानंतर झाली उपरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बार काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी कायद्याचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे. हैदराबाद येथील नालासार विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या हस्ते दीक्षांत समारंभात पदवी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर बार काऊंसिल ऑफ इंडियाने या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यास नकार दिला होता. याप्रकरणी सरन्यायाधीशांनी बार काऊंसिलला फटकारल्यानंतर आता मनन मिश्रा यांना उपरती झाली असून त्यांनी अधिकृत पत्रक जारी करून विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे.

जेव्हा कधी विद्यार्थी दुखावले जातात, तेव्हा त्यांच्या तक्रारी आणि चिंता पूर्ण संवेदनशीलतेने, संयमाने आणि आदराने ऐकून घेतल्या पाहिजेत. या वादाशी संबंधित माझ्या कोणत्याही विधानाने किंवा पत्रामुळे कायदा विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर ते स्वीकारण्यात मला कोणताही संकोच नाही. खेद व्यक्त करणे किंवा माफी मागणे हा कोणाच्या प्रतिष्ठेचा किंवा अहंकाराचा विषय नसावा. आपल्या विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या अडचणी आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत, हे मान्य करणेच योग्य आहे, असे मनन मिश्रा म्हणाले.

आता हा संपूर्ण विषय आपापसातील सामंजस्याच्या भावनेने सोडवला जावा. या संवेदनशील मुद्द्याला कोणतेही राजकीय किंवा बाह्य रूप देऊ नये. बाहेरील प्रभावांमुळे या शैक्षणिक वादाला विनाकारण खतपाणी घातले जाऊ नये, जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करू शकतील, असेही ते पुढे म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

देशातील बेरोजगार तरुणांना ‘कॉक्रोच’ म्हटल्यानंतर सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्याविरोधात तरुणांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे हैदराबाद येथील नालासार या विधि विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर बार काऊंसिल ऑफ इंडियाने नालासार विद्यापीठाच्या 2026 च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी रोखण्याचे आदेश दिले होते. त्यावर सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली होती. विद्यार्थ्यांचा निर्णय चुकीचा किंवा त्यांना कोणी चुकीचा सल्ला दिला असेल. तरीही त्यांना मुद्दा मांडण्याचा आणि विरोध करण्याचा अधिकार आहे. हा माझा आणि विद्यार्थ्यांमधील मुद्दा आहे. यात नाक खुपसणारे बार काऊंसिल कोण? असा प्रश्न करत सरन्यायाधीशांनी खडे बोल सुनावले. तसेच सरन्यायाधीशांनी बार काऊंसिलला नोटीस बजावतृ विद्यापीठाच्या कोणत्याही विद्यार्थी किंवा फॅकल्टीविरोधात दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेश दिले होते.