
ठाण्यातील तीनहात नाका परिसरात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 3000 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला आढळलेली गळती बंद करण्याचे काम शनिवारी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. त्यामुळे मुंबईत काही ठिकाणी विस्कळीत झालेला पाणीपुरवठा रात्री 9 वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने सुरळीत होणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या जलवाहिनीला गुरुवारी रात्री मोठी गळती लागली. त्यामुळे जल विभागाकडून तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जलवाहिनीच्या भागाभोवतीचा परिसर खोदकाम करून उघडण्यात आला. खराब झालेल्या भागावर मृदू पोलाद पॅच प्लेट बसवून ती वेल्डिंगद्वारे कायमस्वरूपी दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आले.
पाण्याच्या प्रचंड दाबामुळे दुरुस्ती कार्यवाहीत अडथळे निर्माण झाले. परिणामी, शहर व पूर्व उपनगरातील पाणीपुरवठा प्रभावित झाला होता. अखेर पिसे उदंचन पेंद्र व पांजरापूर जल शुद्धीकरण प्रकल्प यांच्यासमवेत समन्वय साधून पाणीपुरवठय़ावर नियंत्रण आणण्यात आले. क्षतीग्रस्त दाबयुक्त जलवाहिनीची सुरक्षितपणे दुरुस्ती करण्यात आली. जल कार्य (नगरबाह्य) विभागाचे अभियंते आणि कर्मचारी यांच्या टीमने गळती दुरुस्ती कार्यवाही सायंकाळी पाच वाजता युद्धपातळीवर पूर्ण केली.
























































