
मुंबई महापालिकेने मुंबईकरांच्या सोयीसाठी ‘पेडिस्ट्रियन फर्स्ट’ मोहीम सुरू केली असून गेल्या दोन आठवडय़ांत केलेल्या कारवाईमध्ये 68 किमी फुटपाथ फेरीवालामुक्त करण्यात आले आहे. शिवाय 77 अनधिकृत बांधकामेही पालिकेने हटवली आहेत.
‘पेडिस्ट्रियन फर्स्ट’ अभियानांतर्गत मुंबई शहर व उपनगरांमध्ये पदपथांवरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचे अडथळे, साठवणूक साहित्य, फलक, बॅनर तसेच पादचारी मार्गात येणारे अन्य अडथळे दूर करण्यासाठी व्यापक कारवाई करण्यात पालिकेकडून करण्यात येत आहे. सर्व 26 प्रशासकीय विभागांमध्ये या अभियानाची अंमलबजावणी सुरू असून, पहिल्या टप्प्यात 200 पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. त्यापैकी 81 पदपथांचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे 68 किलोमीटर अंतर इतके पदपथ अडथळामुक्त करण्यात आले असून 443 कारवाई सुरू करण्यात आल्या आहेत.
अशी झाली कारवाई
अभियानाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत दिनांक 1 ते 14 ऑगस्ट या कालावधीत एकूण 337 कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये 77 अनधिकृत बांधकामे आणि 112 अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्यात आले आहे.
यासोबतच पदपथांवरील 49 स्ट्रीट फर्निचर, 63 साठवणूक साहित्य, 27 दुकानांचे फलक, 14 साईनबोर्ड आणि 49 बॅनर हटविण्यात आले आहेत.
अडथळा ठरणाऱ्या 25 अधिकृत दुकानांलगतच्या संरचनांची दुरुस्ती, 8 पदपथांची दुरुस्ती तसेच पदपथांवर निर्माण झालेल्या 8 अनधिकृत वाहनतळांचे निर्मूलन करण्यात आले आहे.
रेल्वे, मेट्रो, बसस्थानक, शाळा, रुग्णालये, बाजारपेठांना प्राधान्य
या अभियानाच्या पहिल्या टप्प्यांत पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असलेल्या तसेच ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती आणि इतर संवेदनशील घटक मोठय़ा प्रमाणावर वापर करतात अशा ठिकाणच्या पदपथ सुधारणांना प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके, बसस्थानके, रुग्णालये, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये यांचा समावेश आहे.
























































