
भाजप नेते गोपीनाथ मुंडे कॉँग्रेसमध्ये येणार होते. मात्र त्यासाठी त्यांनी मंत्रिपदाची अट ठेवली होती. मला मंत्रिपद द्या अन्यथा नागपूरचे भाजपचे दोन नेते परत निवडून येऊ देणार नाहीत. त्यामुळे मला काहीतरी पद द्या, असे मुंडे म्हणाल्याचा खळबळजनक गौप्यस्पह्ट कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्या वेळी भाजपमध्ये जातीवादाचा विषय होता, असेही ते म्हणाले.
गोपीनाथ मुंडे हे भाजपमध्ये अत्यंत अस्वस्थ होते. मी मुख्यमंत्री असताना त्यांना काँग्रेसमध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी सोनिया गांधी यांची परवानगीदेखील घेतली होती. पण मुंडे यांनी पेंद्रात मंत्री करण्याची अट ठेवली होती. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, एकदम पॅबिनेट मंत्री शक्य होईल की नाही माहिती नाही. पण राज्यमंत्री करता येईल! मात्र तत्कालील पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना मंत्रिपद देण्यास नकार दिल्यामुळे मुंडे यांचा कॉँग्रेस प्रवेश होऊ शकला नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
ती माझ्या आयुष्यातील राजकीय चूक
मुंडे यांच्या प्रवेशाबाबत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी त्यांनी विरोधी पक्षातील खासदाराला आपल्या पक्षात घेऊन थेट मंत्री करणे योग्य नसल्याचे सांगत रागावले. मी मनमोहन सिंग यांना न विचारताच मुंडे यांच्या पक्षप्रवेशाला हो म्हणालो आणि परस्पर त्यांना आश्वासन दिलं होतं… ती माझ्या आयुष्यातील मोठी राजकीय चूक होती, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
























































