
बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत आले आहेत. ‘विमल वेलची’ या उत्पादनाच्या जाहिरातीसंदर्भात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या तिन्ही सुपरस्टार्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महाराष्ट्रात बंदी असलेल्या ‘विमल पान मसाला’ या प्रतिबंधित उत्पादनाचा अप्रत्यक्ष म्हणजेच सरोगेट जाहिरातीच्या माध्यमातून प्रचार केला जात असल्याचा प्राथमिक ठपका एफडीएने ठेवला आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 मधील तरतुदींनुसार दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये सहभागी असल्याचा आरोप सिद्ध झाल्यास या कलाकारांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाला सामोरे जावे लागू शकते. एफडीएने या प्रकरणी कारवाई करत अजय देवगणला त्याच्या जुहू येथील निवासस्थानी, शाहरुख खानला वांद्रे येथील ‘मन्नत’ या बंगल्यावर आणि टायगर श्रॉफला त्याच्या ‘टायगर श्रॉफ प्रोडक्शन्स एलएलपी’ या कंपनीच्या पत्त्यावर नोटीस पाठवून यावर स्पष्टीकरण मागवले आहे. महाराष्ट्र अन्न सुरक्षा आयुक्तांनी 13 जुलै 2026 रोजी काढलेल्या आदेशानुसार, अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम 30(2)(अ) अन्वये राज्यात पान मसाल्याचे उत्पादन, साठवणूक, पुरवठा आणि विक्रीवर एका वर्षासाठी पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. एफडीएच्या प्राथमिक तपासणीनुसार, या जाहिरातीचा सूर, संवाद, नाव आणि बाजारातील स्वरूप हे प्रतिबंधित विमल पान मसाल्याशी थेट साधर्म्य दर्शवणारे आहे.
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यात तंबाखू, गुटखा आणि पान मसाल्याच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात मोहीम राबवली जात आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांचे संघटित जाळे नष्ट करण्यासाठी एफडीए पोलिसांच्या मदतीने ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गतही कारवाई करत आहे. अप्रत्यक्ष जाहिरातींविरोधात थेट कलाकारांवर अशी कठोर कारवाई करण्याची एफडीएची ही पहिलीच वेळ मानली जात आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालणाऱ्या कलम 24 आणि शिक्षेची तरतूद असलेल्या कलम 53 चा वापर करून एफडीएने ही नोटीस बजावली असून, आता यावर तिन्ही कलाकार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


























































