
स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात लोकप्रतिनिधींच्या बैठक व्यवस्थेवरून चांगलेच मानापमान नाट्य रंगले. “तुम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना एका बाजूला खाली थांबायला सांगता आणि स्वतः ध्वजारोहण करायला जाता; हा कोणता प्रोटोकॉल आहे?” असा संतप्त सवाल करत भाजपचे राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांनी पालकमंत्री नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्यावर चांगलीच आगपाखड केली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते, आमदार राजू नवघरे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जि. प. सीईओ विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि इतर वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडत असताना पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि सीईओ हे मंचावर वरच्या बाजूला जात असताना, खासदार रामराव वडकुते यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींना खाली एका बाजूला उभारण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. सोहळ्यात योग्य तो मानापमान आणि प्रोटोकॉल न पाळल्यामुळे खासदार रामराव वडकुते यांचा संताप अनावर झाला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात लोकप्रतिनिधींच्या बैठकी व्यवस्थेवरून चांगलेच मानापमान नाट्य रंगले. भाजपचे राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते पालकमंत्र्यांसह अधिकाऱ्यांवर भडकले. pic.twitter.com/inOP6wxKij
— Saamana Online (@SaamanaOnline) August 16, 2026
ध्वजारोहण पार पडताच वडकुते यांनी पालकमंत्री झिरवाळ, जिल्हाधिकारी गुप्ता आणि सीईओ गायकवाड यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. “तुम्ही लोकप्रतिनिधींची अशी बैठक व्यवस्था केली का? काही प्रोटोकॉल पाळणार आहात की नाही? ध्वजारोहणासाठी आम्हाला एका बाजूला थांबवता, किमान समोर तरी बोलावायचे? ही पद्धत अजिबात योग्य नाही,” अशा शब्दांत वडकुते यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधींचा अनादर झाल्याच्या या प्रकारामुळे सोहळ्यास उपस्थित नागरिकांमध्येही तीव्र चर्चा सुरू झाली होती. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
























































