
बेल्जियममधील एका घरातील भिंत पाडत असताना कामगारांना सोन्याचा खजिना सापडल्याची घटना समोर आली आहे. या खजिन्याची किंमत अंदाजे ९९ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. आता हा अफाट खजिना कोणाचा आणि तो कोणाला मिळणार, यावरून चर्चांना उधाण आले आहे.
टीव्ही९ भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, बेल्जियमच्या डेंडर्मोंडे शहरातील एका जुन्या इमारतीचे नूतनीकरण सुरू होते. इमारतीत नवीन सीवर पाईप टाकण्यासाठी कामगार भिंतीची खोदकाम करत होते. याच वेळी कामगारांना भिंतीच्या आत सोन्याचे शिक्के आणि सोन्याच्या विटांचा साठा सापडला.
ही घटना १८ वर्षांचा कामगार कोबे याच्या निदर्शनास आली. त्याने सुरुवातीला हे साधे नाणे असावे असे समजले, पण जेव्हा सोनेरी विटा दिसल्या, तेव्हा सर्वांचेच डोळे विस्फारले. कामगारांनी प्रामाणिकपणा दाखवत तातडीने पोलिसांना या खजिन्याबद्दल माहिती दिली. या खजिन्यात सोन्याच्या विटा आणि प्राचीन नाण्यांचा समावेश असून त्याची एकूण ९९ कोटी रुपये इतकी आहे.
आता हा खजिना कोणाला मिळणार?
सध्या हा सर्व खजिना पोलिसांच्या ताब्यात असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बेल्जियमच्या कायद्यानुसार, अशा सापडलेल्या खजिन्याच्या बाबतीत एक निश्चित प्रक्रिया आहे.
१. बेल्जियमच्या नियमांनुसार, या खजिन्याचा खरा वारसदार किंवा मालक शोधण्यासाठी सरकार ५ वर्षांची मुदत देते. या काळात जर कोणीही कायदेशीर मालक समोर आला नाही, तरच पुढील कारवाई केली जाते.
२. जर ५ वर्षांच्या आत कोणीही मालक दावा सांगायला पुढे आले नाही आणि तो खजिना कोणत्याही गुन्ह्याशी संबंधित नसल्याचे सिद्ध झाले, तर बेल्जियमच्या कायद्यानुसार या खजिन्याची वाटणी केली जाते. ही वाटणी खजिना शोधणारे कामगार आणि ज्या इमारतीत हा खजिना सापडला, त्या इमारतीच्या मालकामध्ये केली जाऊ शकते.
सध्या ही इमारत एका धर्मादाय संस्थेच्या मालकीची आहे, जी गरजूंची मदत करण्याचे काम करते. या संस्थेच्या संचालकांनी सांगितले की, खजिना कोणाला मिळेल हे अद्याप स्पष्ट नसले तरी, जर तो संस्थेला मिळाला तर त्याचा वापर समाजकार्यासाठी केला जाईल. सध्या हे प्रकरण बेल्जियममध्ये चर्चेचा विषय ठरले असून, ५ वर्षांनंतर या सोन्याचा खरा वारसदार कोण ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.























































