
गोरेगाव पूर्वेकडील भाजपच्या नगरसेविका प्रीती सातम यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी स्वातंत्र्यदिनी फडकविण्यात आलेला राष्ट्रध्वज दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत उतरवला नाही. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी केली आहे. याबाबत दिंडोशी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. निर्धारित वेळेनंतर राष्ट्रध्वज फडकत असल्याचे छायाचित्र आणि व्हिडीओ पोलिसांना देत कारवाईची मागणी केली आहे.
शनिवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजप नगरसेविका प्रीती सातम यांच्या हस्ते साईबाबा कॉम्प्लेक्स येथील त्यांच्या कार्यालयाच्या आवारात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला होता. राष्ट्रध्वजासंबंधित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खुल्या जागेत राष्ट्रध्वज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकवण्यात यावा आणि राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा व सन्मान कायम राखणे आवश्यक आहे. हा नियम असताना सातम यांच्या कार्यालयाबाहेरील राष्ट्रध्वज रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ध्वजस्तंभावर फडकत असल्याचे निदर्शनास आले. ही अत्यंत गंभीर बाब असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शाखा क्र. 52 चे शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी याबाबत दिंडोशी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे तक्रार केली आहे.
सीसीटीव्ही, डिजिटल पुरावे तपासण्याची मागणी
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, फोटो, व्हिडीओ व इतर उपलब्ध डिजिटल पुरावे तातडीने तपासून सुरक्षित ठेवण्यात यावे, संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवून त्यांच्याकडून झालेली कृती नियम-तरतुदींशी सुसंगत होती की नाही, याची पडताळणी करण्यात यावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे गाढवे यांनी केल्या आहेत.
सदर घटनेमध्ये राष्ट्रध्वज निर्धारित वेळेनंतरही ध्वजस्तंभावर ठेवण्यात आला होता का, तो रात्रीच्या वेळी योग्यवेळी प्रकाशित करण्यात आला होता का, ध्वजाची स्थिती काय होती, तसेच संबंधित व्यक्तींकडून जाणीवपूर्वक अथवा निष्काळजीपणे राष्ट्रध्वजाच्या सन्मानास बाधा आणणारी कृती झाली का, याची तातडीने व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि दोषी व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी केली आहे.




























































