
हिंदुस्थान सरकारने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रत्यार्पण केले तरच हिंदुस्थानचा अधिकृत दौरा करू, अशी अट बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रेहमान यांनी घातली आहे. त्यामुळे मोदी सरकार पेचात पडले आहे.
जेन-झी उठावानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देशातून पलायन करावे लागले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचा पराभव होऊन बांगलादेश नॅशनल पार्टीची सत्ता आली. तारिक रेहमान हे सध्या पंतप्रधानपदी आहेत. त्यांनी हिंदुस्थानचा दौरा करावा असे दोन्ही देशांचे प्रयत्न होते. हिंदुस्थानने तसे आमंत्रणही दिले होते. मात्र, मागील आठवडय़ात हसीना यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेमुळे हे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
बांगलादेशने आता रेहमान यांच्या दौऱयासाठी अट ठेवली आहे. ‘उच्चस्तरीय दौऱयासाठी दोन्ही देशांत अनुकूल वातावरण असायला हवे. सध्या तशी परिस्थिती नाही. हिंदुस्थानने हसीना यांना परत पाठवले तरच तारिक रेहमान यांच्या अधिकृत दौऱयाचा विचार करता येईल, असे बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री शाहिदूल करीम यांनी आज स्पष्ट केले.




























































