
नातेवाईकाच्या दहाव्यावरून परतत असताना काळाने घाला घातला. नियंत्रण सुटल्याने कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आई-वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे. तेलंगणाच्या सिद्दिपेट जिल्ह्यात डुब्बाक मंडळातील अप्पनापल्ली गावाजवळ बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, राजू (35), भाग्य (22), पाच वर्षांचा मुलगा नियांश आणि तीन वर्षांची मुलगी शान्विका अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण बलवंतपूर गावचे रहिवासी होते. हे कुटुंब एका नातेवाईकाच्या दहाव्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी सिद्दिपेटला गेले होते. घरी परतत असताना अप्पनापल्ली गावाजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याजवळ असलेल्या विहिरीत कोसळली.
मध्यरात्रीपर्यंत राजू घरी न परतल्याने कुटुंबीयांनी जोडप्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांचे मोबाईल फोन बंद होते; त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला. मोबाईल फोनच्या लोकेशन डेटाचा वापर करून पोलिसांनी कुटुंबाचा मागोवा घेतला आणि अप्पनापल्ली जवळील विहिरीत बुडालेली गाडी शोधून काढली.
गाडी सापडल्यानंतर त्वरित बचावकार्य सुरू करण्यात आले, परंतु गाडीतील चौघांचाही मृत्यू झाला होता. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे बलवंतपूर गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.


























































