तुमची भीती दाखवते की तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करत आहात! राहुल गांधींनी अमित शहांना पोस्ट केली टॅग; FIR नोंदवल्याशिवाय हटणार नसल्याचे केले स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi-targets-amit-shah-over-jantar-mantar-pellet-gun-case-protests-at-parliament-street-police-station

दिल्लीतील जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून वातावरण अजून तापलेले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले असून जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनच्या वापरासंदर्भातील एफआयर नोंदवला जात नाही तोपर्यंत आपण येथून हटणार नाही,असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घेरले आहे. ‘न्याय करण्यापासून एवढे का घाबरत आहात? तुमची ही भीती दाखवून देते की तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करत आहात’, असं राहुल गांधी यांनी या पोस्टमधून म्हटले आहे.

राहुल गांधी हे आज पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात पोहोचले आणि तेथून तपासाची माहिती घेण्यासाठी ते डीसीपींच्या कार्यालयात गेले. तपास कोणत्या टप्प्यावर आहे आणि आतापर्यंत काय निष्पन्न झाले आहे, हे त्यांनी जाणून घेतले.तपासाच्या निकालांचा संपूर्ण तपशील किंवा पोलिसांनी केलेल्या कोणत्याही ठोस कारवाईची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, असल्याचे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, यावेळी राहुल गांधी यांनी पॅलेट गन हल्ल्यातील पीडित साहिल लोहबाख यांना सोबत नेले होते. राहुल यांनी आरोप केला की, अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही. जोपर्यंत एफआयआर नोंदवला जाणार नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी ठाम भूमिका जाहीर केली आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिले आहे की, ‘आज साहिल लोचब यांच्यासोबत, त्यांच्यावर झालेल्या पोलिसांच्या बर्बरतेविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी संसद मार्ग येथील डीसीपी कार्यालयात पोहोचलो. २० जुलै रोजी जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या साहिलवर पोलिसांनी पॅलेट गनने हल्ला केला. छर्र्यांमुळे गंभीर जखमी झालेल्या साहिलच्या एका डोळ्याची दृष्टी धोक्यात आली आहे. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात केलेले असे अत्याचार पाहून देखील कोणतीही कायदेशीर कारवाई नाही, हा तर गंभीर गुन्हा आहे. या क्रूरतेबद्दल ना गृहमंत्री अमित शाह यांनी विद्यार्थ्यांना कोणतेही स्पष्टीकरण दिले, ना पंतप्रधानांनी त्यांची माफी मागितली’.

ते पुढे लिहितात की, ‘आता साहिल न्यायासाठी एफआयआर दाखल करू इच्छित आहे, तर त्यालाही ते करू दिले जात नाही. अशा प्रकारे संविधान आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांची पायमल्ली केली जात आहे’

आपली ही पोस्ट राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील टॅग केली आहे. ‘न्याय करण्यापासून एवढे का घाबरत आहात? तुमची ही भीती दाखवून देते की तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करत आहात’.

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्ट मध्ये ठाम विश्वास व्यक्त केला ही की, ‘एफआयआर दाखल होईल. न्यायालयीन चौकशी होईल. आणि वरपासून खालपर्यंत या क्रूरतेसाठी जे कोणी दोषी आहेत, त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. साहिल आणि त्याच्यासारख्या पीडित प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळवून देणारच’.

दरम्यान, या ठिय्या आंदोलनावेळी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी, काँग्रेस नेते प्रवक्ते जयराम रमेश देखील उपस्थित होते.