
निर्माणाधीन मॉलमध्ये शटरिंग कोसळल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील रुक्मिणी विहार येथील ओमेक्स मॉलमध्ये शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. जखमीला आग्रा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
हिंदुस्थान लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, रुक्मिणी विहार चौकाजवळ ओमेक्स मॉल बांधत आहे. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कामगार शटरिंगचे काम करत असताना शटरिंग कोसळले. घटनेनंतर एकच गोंधळ उडाला आणि चार कामगार त्याखाली अडकले.
घटनास्थळावरील इतर कामगार आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. चौघांनाही ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत एका कामगाराचा मृत्यू झाला होता. दोघांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या एका कामगाराला आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

























































