
अनेकजण जेवण झाल्यानंतर लगेच बसतात किंवा झोपतात. विशेषतः रात्रीचे जेवण झाल्यानंतर आराम करण्याची सवय अनेकांना असते. मात्र, जेवल्यानंतर काही वेळ हलके चालणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत होऊ शकते.
जेवण केल्यानंतर शरीरात पचनाची प्रक्रिया सुरू होते. यावेळी शरीरात अनेक बदल घडतात. अशा वेळी बराच वेळ एकाच जागी बसून राहिल्यास किंवा लगेच झोपल्यास काही लोकांना पोट जड होणे, गॅस, पोट फुगणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा समस्या जाणवू शकतात.
जेवल्यानंतर हलके चालल्याने शरीराची हालचाल वाढते. त्यामुळे पोट आणि आतड्यांमधून अन्न पुढे जाण्यास मदत होऊ शकते. परिणामी पचनक्रिया सुधारण्यासोबतच गॅस, पोट फुगणे आणि ढेकर येण्यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
जेवल्यानंतर चालण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. चालताना स्नायू ग्लुकोजचा वापर करतात. त्यामुळे विशेषतः रक्तातील साखरेशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींना जेवणानंतरचा वाॅक फायदेशीर ठरतो. याशिवाय नियमित चालण्यामुळे रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यालाही फायदा होऊ शकतो. शारीरिक हालचालींमुळे कॅलरी खर्च होतात, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत मिळू शकते.
जेवण झाल्यानंतर साधारण १० ते ३० मिनिटांच्या आत हलक्या किंवा मध्यम वेगाने चालण्यास सुरुवात करता येते. सुरुवातीला १० मिनिटांची हलकी वॉक पुरेसा आहे.
जेवण झाल्यानंतर लगेच वेगाने चालणे किंवा जोरदार व्यायाम करणे टाळावे. सुरुवात नेहमी संथ गतीने करावी आणि शरीराला होणारा त्रास लक्षात घ्यावा. चालताना पोटदुखी, मुरडा, अपचन, गॅस किंवा पोट फुगण्यासारखी लक्षणे जाणवली तर काही वेळ थांबणे योग्य आहे.



























































