
चिपळूण तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीच्या काठावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या नंदिनी भुपेंद्र पवार (35) यांच्यावर दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक हल्ला केला.
मगरीने नंदिनी यांचा पाय जबडय़ात पकडून त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत नंदिनी यांनी काठावरील दगड घट्ट पकडून ठेवला. दरम्यान, आईवर झालेला हल्ला पाहून 10 वर्षांच्या मुलीने क्षणाचाही विलंब न करता धाडस दाखवले. तिने आईचा हात पकडून तिला पाण्याबाहेर खेचले. मुलीच्या या धाडसामुळे नंदिनी पवार यांचा जीव वाचला. यामुळे या चिमुकलीचे कौतुक होत आहे. नदीत पोहणे, कपडे किंवा जनावरे धुण्यासाठी पाण्यात जाणे टाळावे. तसेच लहान मुलांना नदीकाठावर जाऊ देऊ नये, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी सांगितले.
मगरीशी दोन हात
आईला मगर पाण्यात ओढत असल्याचे लक्षात येताच स्वर्णी घाबरून न जाता तातडीने आईच्या मदतीला धावली. तिने आईचा हात पकडून आपल्या परीने सर्व ताकद लावत तिला पाण्याबाहेर खेचले. चिमुकलीच्या धाडसामुळे नंदिनी पवार यांचा जीव वाचला.



























































