
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन सेवेतील बसफेऱ्यांची अनियमितता, कर्मचारी व्यवस्थापन, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वाढता वापर, तिकीट उत्पन्नातील संभाव्य गळती आणि बस दुरुस्तीतील दुर्लक्षाच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी परिवहन प्रशासनाला धारेवर धरले. केडीएमटीच्या भोंगळ कारभाराचा पंचनामाच यावेळी केला. दिवसभरात ५५ बस फेऱ्या धावत असल्याचे प्रशासनाच्या कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात मात्र २६ बसफेऱ्या होतात. याचा जाब शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विचारताच अधिकारी निरुत्तर झाले.
शिवसेना उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी परिवहन व्यवस्थापक विजयकुमार द्रासे यांच्या कार्यालयात धडक देत विविध तक्रारी मांडल्या. महापालिकेच्या परिवहन विभागाकडून सकाळी सुमारे ५५ आणि दुपारी ५५ बस मार्गावर असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात सकाळी केवळ २६ बस धावत असून त्याच बस पुन्हा दुपारी वापरल्या जात असल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला. यावर अधिकाऱ्यांना काहीच स्पष्टीकरण देता आले नाही. यावेळी उपनेते अल्ताफ शेख, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, शहरप्रमुख बाळा परब, महिला शहर संघटक मीनल कांबळी, विधानसभा संघटक सुजाता धारगळकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
नियमित कर्मचारी असतानाही कंत्राटी भरती
परिवहन उपक्रमात मोठ्या संख्येने नियमित चालक-वाहक उपलब्ध असतानाही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बससेवा चालवली जात असल्याचा आरोप केला. कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती, उपस्थिती, पात्रता, वेतन आणि ठेकेदाराला करण्यात आलेल्या देयकांचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याची मागणी करण्यात आली.





























































