
नालासोपारा पूर्वेकडील ओस्तवाल नगरी परिसरात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या महिला इन्स्टाग्राम स्टार असून इन्स्टाग्राम क्रिएटर्समध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. भररस्त्यात इन्स्टाग्राम स्टार फाइट मास्टर झाल्या आणि ढिश्यूम ढिश्यूम सुरू झाले. यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
काही दिवसांपूर्वी ट्रेनमधील एका व्हिडीओमुळे यातील एक महिला सोशल मीडियावर चर्चेत आली होती. व्हिडीओला अधिकाधिक व्ह्यूज मिळवण्यासाठी दोन महिलांमध्ये ईर्ष्या होती. काही दिवसांपूर्वी या दोन्ही महिला एकाच ग्रुपमध्ये सोशल मीडिया व्हिडीओ तयार करत होत्या. तसेच एकमेकींसोबत वेळही घालवत होत्या. मात्र व्हिडीओ व्हायरल करण्याची स्पर्धा, वाढते व्ह्यूज आणि त्यातून दोघींमध्ये वाद वाढत होता. याच वादातून नवजीवन स्कूलजवळ या दोघींमध्ये भररस्त्यात हाणामारी झाली. घटनास्थळी अक्षरशः कुस्तीचा आखाडा भरल्याचे चित्र होते.





























































