
बांगलादेशातील रंगपूर शहरात हिंदु कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली. मृतांमध्ये निवृत्त शालेय शिक्षकासह पत्नी, मुलगी आणि 12 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. प्राथमिक तपासानुसार, चौघांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस, सीआयडी आणि गुप्तचर शाखेची (डीबी) पथके संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, रंगपूर शहरातील दासपारा परिसरात शनिवारी रात्री 11.30 वाजता ही घटना उघडकीस आली. गणपती चक्रवर्ती (65), प्रीतिलता चक्रवर्ती (50), आमी चक्रवर्ती प्रति (23) आणि प्रियम चक्रवर्ती (12) अशी मृतांची नावे आहेत. आई आणि मुलीचा मृतदेह जिन्यातून बाहेर काढण्यात आले, तर गणपती चक्रवर्ती यांचा मृतदेह घराच्या छतावर आढळला. त्यांच्या 12 वर्षांच्या मुलाचा मृतदेह पलंगाखाली सापडला, असे रंगपूर मेट्रोपॉलिटन सीआयडीचे प्रभारी सुबीर चौधरी यांनी सांगितले.
ही घटना गुरुवार मध्यरात्री ते शुक्रवार पहाटेच्या दरम्यान घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबातील चौघांचेही मोबाईल फोन गुरुवार रात्रीपासून बंद होते. प्रीतिलताची धाकटी बहीण पूजा चक्रवर्ती हिचे तिच्या बहिणीशी शेवटचे गुरुवारी दुपारी बोलणे झाले होते.
फोन सतत बंद येत असल्याने कुटुंबातील सदस्य शनिवारी रात्री त्यांच्या दासपारा येथील घरी दाखल झाले. मात्र घराचा मुख्य गेट बंद होता आणि घरातील सर्व दिवे बंद होते. त्या पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस घटनास्थळी पोहचत कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला असता चौघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळले.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गणपतीचे कोणाशीही वैर नव्हते. सेवानिवृत्तीनंतर गणपती होमिओपॅथी चिकित्सक म्हणून काम करत होते, असे त्यांची भाची सोमा चक्रवर्ती यांनी सांगितले. हे कुटुंब सुमारे चार वर्षांपासून या परिसरात राहत होते.

























































