
बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त संघटना यूएफबीयूने येत्या 11 सप्टेंबरला देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. आठवडय़ातून पाच दिवस बँका सुरू ठेवण्याच्या निर्णयाला होत असलेला विलंब, पीएलआयबाबत निर्माण झालेले मतभेद आणि पेन्शनशी संबंधित अनेक प्रकरणे प्रलंबित मागण्यांवर अद्याप तोडगा न निघाल्याने ही संपाची हाक देण्यात आली आहे. हा संप झाल्यास देशातील अनेक भागात सलग चार दिवस बँकिंग सेवेवर परिणाम होऊ शकतात. 11 सप्टेंबरला शुक्रवार असून त्यानंतर शनिवार, रविवारी सुट्टी आहे. तसेच 14 सप्टेंबरला काही राज्यांमध्ये गणेश चतुर्थीची सुट्टी असल्याने बँका बंद राहणार आहेत.
सरकार आणि बँक व्यवस्थापनाने आपल्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर 28 सप्टेंबरपासून तीन दिवसांचा सलग संप करण्याचा इशारा यूएफबीयूने दिला आहे. जर तरीही मागण्या मान्य झाल्या नाही तर 26 ऑक्टोबरपासून अनिश्चित काळासाठी संप सुरू करण्याचा इशारासुद्धा या संघटनेने दिला आहे.


























































