ठसा- प्रा. यास्मिन शेख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेधा पालकर

मराठी माणसे बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतात. मात्र असे करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करीत आहोत याचे त्यांनी भान ठेवायला हवे. बोलीभाषा कशीही असली तरी ललित वाङ्मय असो किंवा वैचारिक लेखन, ते करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, हे परखड भाष्य कोणा कट्टर मराठीप्रेमी नेत्याचे नव्हते, तर जन्माने  बेने इस्रायली ज्यू, लग्नाने मुस्लिम आणि पेशाने मराठी व्याकरण तसेच भाषाशास्त्र्ााच्या अध्यापक असलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचे होते. त्यांचे मूळ नाव जेरुशा जॉन रुबेन.

जन्म  नाशिकमधील. जेरुशा रुबेन यांचा  संपूर्ण जीवनप्रवास विस्मयकारक आणि प्रेरणादायी आहे. पॅलेस्टाइन या देशातल्या अनन्वित छळाला कंटाळून अनेक वर्षांपूर्वी कितीतरी ज्यू कुटुंबांनी जगभरातल्या अनेक देशांत स्थलांतर केले. त्यातील काही कुटुंबं भारतात आली. इथे रुजत इथली भाषाच नाही, तर प्रथा-परंपरा, रीतिरिवाज, सण-उत्सव…सर्व काही स्वीकारले. ती ‘भारतीय’ झाली. रुबेन यांचे कुटुंबही त्यापैकीच एक. वडील जॉन रुबेन सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते. त्यामुळे त्यांची ठरावीक काळाने बदली व्हायची. यामुळे त्यांचे शालेय शिक्षण पंढरपूरला झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स. प. महाविद्यालयात.  तेथे त्यांनी मराठी भाषा व साहित्य हा विषय घेतला. त्यावेळी त्यांना श्री. म. माटे हे शिक्षक म्हणून लाभले.

माटे मास्तरांच्या उत्तम मराठी शिकवण्याच्या, त्यातही मराठी व्याकरण शिकवण्याच्या पद्धतीमुळे रुबेन मराठीच्या, मराठी व्याकरणाच्या प्रेमात पडल्या. बीए, बीटीला त्यांनी फर्स्ट क्लास मिळवत नंतर एम.एम. केले. संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालयामध्ये अध्यापन व त्यानंतर तब्बल 28 वर्षे त्यांनी सायनच्या (मुंबई) ए.आय.ई.एस. महाविद्यालयात अध्यापन केले. तिथे श्री. पु. भागवत हे त्यांचे सहकारी होते. शेख यांनी ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ व ‘मराठी शब्दलेखनकोश’ ही मराठी व्याकरणाविषयीची दोन नितांत सुंदर पुस्तकं लिहिली आहेत. या पुस्तकांवर त्यांचे नाव यास्मिन शेख असं आहे. त्याचीही एक गोष्ट आहे.

जात, धर्म, वंश यापलीकडे जाणून निखळ मानवतावादी झालेल्या रुबेन यांनी अझीझ अहमद शेख यांच्याशी लग्न केले. स्वच्छ व सुंदर मराठी शब्दोच्चार आणि नखशिखांत महाराष्ट्रीय संस्कृतीशी एकरूप झालेलं व्यक्तिमत्त्व, असं यास्मिन शेख यांचं वर्णन करता येईल. त्यांचा विवाह प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांच्या पुढाकारानं झाला.

शीव येथील महाविद्यालयात शिकवत असताना त्या तेथील बीएच्या विद्यार्थ्यांना भाषाशास्त्र व व्याकरण हे विषय शिकवत. तेव्हा विभागप्रमुख असलेल्या श्री. पु. भागवतांना वाटले की, हा विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल आणि त्याचे उत्तम प्रकारे अध्यापन करायचे असेल तर आधुनिक भाषाशास्त्र शिकायला हवे. तसे त्यांनी बाईंना सुचवताच त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यांची भाषाशास्त्र व व्याकरणाची गोडी आवडीतून जीवनध्यासात बदलली. पुढे त्यांनी अतिशय कळकळीने, तळमळीने हे विषय आपल्या विद्यार्थ्यांना शिकवले.

आयुष्यभर त्या व्याकरणशुद्ध मराठी भाषेच्या कमालीच्या आग्रही राहिल्या. प्रमाण भाषा व बोलीभाषा यांत फरक केला पाहिजे आणि त्यानुसार त्या त्या जागी त्याप्रमाणे भाषा वापरली पाहिजे, असे त्या सांगत. मराठी व्याकरणाविषयी त्या आग्रही असल्या तरी दुराग्रही अजिबात नव्हत्या. त्यामुळे साहित्य महामंडळाने बनवलेले व राज्य सरकारने मान्य केलेले सध्याचे मराठी व्याकरणाचे नियम बदलायलाही त्यांची हरकत नव्हती. त्या नियमांत अधिकृतपणे बदल केला जावा, एवढीच यास्मिन शेख यांची अपेक्षा असायची.

चांगले मराठी शब्द असताना विनाकारण इंग्रजी शब्द वापरू नयेत, असा त्यांचा आग्रह असायचा. मातृभाषेतून शिक्षण याचा पुरस्कार त्यांनी केला मराठी व्याकरणाचा आपल्यापरीनं प्रसार-प्रचार करण्यासाठी 1997 साली ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ हे पुस्तक लिहिले. राज्य मराठी विकास संस्थेने प्रकाशित केलेले हे पुस्तक मराठी व्याकरणाविषयीचे एक अधिकृत पुस्तक मानले जाते. त्यांनी 2007 मध्ये ‘मराठी शब्दलेखनकोश’ तयार केला. मराठी शब्दांचं योग्य रूप कोणतं, याची माहिती देणारा हा कोश मराठी भाषेचे अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, साहित्यिक आणि मराठी भाषाप्रेमी अल्पावधीतच लोकप्रिय झाला.

यास्मिन शेख यांनी बालभारतीच्या मराठीच्या पाठय़पुस्तकांचे इतर सदस्यांच्या सहकार्याने सात वर्षे संपादन केले. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘कार्यात्मक व्याकरणा’च्या पुस्तक निर्मितीत महत्त्वाचा सहभाग होता. त्या ‘अंतर्नाद’ मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या.

राज्य शासनाच्या वतीने डॉ. अशोक केळकर सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. बोलीभाषा कशीही असली तरी लिखाण करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, अशी त्यांची आग्रही भूमिका होती. यास्मिन शेख यांच्या निधनाने जन्माने ज्यू असूनही  कर्माने अस्सल मराठी राहिलेले तसेच मराठी भाषेवर, तिच्या शुद्धतेवर कमालीचे प्रेम असलेले आणि त्याच व्याकरण शुद्ध मराठीचा व्यवहारातही वापर करण्यासाठी आयुष्यभर आग्रही राहिलेले एक व्यासंगी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.