
राज्यात सुटय़ा खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या घोषणेमुळे सर्वसामान्य व पारंपरिक तेल विव्रेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्याची राज्य सरकारने दखल घेतली आहे. अतिशय कमी प्रमाणात तेल विकत घेणाऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून सुटय़ा खाद्यतेलाच्या विक्रीबाबत एसओपी तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. तर रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी येणे अपेक्षितच आहे, पण मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून द्यायला सरकार तयार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. सुटय़ा खाद्यतेलाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी विषय उपस्थित केल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई योग्यच असल्याचे मत सर्व मंत्र्यांचे आहे. पण जे पारंपरिक तेलाचे व्यापारी आहेत त्यांच्यावरही अन्याय होऊ नये तसेच जे गरीब लोक आहेत जे अतिशय छोटय़ा प्रमाणात सुटे तेल घेतात त्यांचीही अडचण नको, यासाठी मध्यम मार्ग काढावा लागेल. तेलात भेसळही होऊ नये यासाठी एसओपी तयार करण्यात येईल असे ते म्हणाले.
पानिपतमध्ये शौर्य स्मारक
हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी आपली भेट घेतली. या भेटीत पानिपत येथील काला आम येथे उभारण्यात येणाऱ्या शौर्यस्मारकाबाबत चर्चा झाली. हे युद्ध म्हणजे मराठय़ांच्या शौर्याचा ऐतिहासिक क्षण आहे. त्याचे स्मारक व्हावे अशी अपेक्षा होती. आपण त्यासाठी जागा घेतली आहे. समितीही तयार केली. मुख्यमंत्री सैनी यांनी आपल्याला सांगितले की, त्यांनाही तिथे स्मारक तयार करायचे आहे. त्यासाठी दोन्ही राज्यांची संयुक्त समिती करू. महाराष्ट्र जे सुचवेल त्यानुसार स्मारक करू , असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रिक्षा-टॅक्सीचालकांना वेळ वाढवून देण्याची तयारी
मराठीच्या सक्तीवरून कोणालाही त्रास देण्याचे कारण नाही. रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठीचा तज्ञ होण्यास सांगितलेले नाही. केवळ जुजबी बोलता आले पाहिजे इतकीच अपेक्षा आहे. कोणाचेही लायसन्स रद्द केलेले नाही. मराठी यावी ही अपेक्षा ठेवणे गैर नाही, पण आपण कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. चालकांना अजून संधी हवी असेल तर वेळ वाढवून द्यायला सरकार तयार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.






























































