बिहारमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटलं; बॅरिकेड्स तोडून CM निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज, पाण्याचा मारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार लोकसेवा आयोगाच्या (बीपीएससी) 70 व्या परीक्षेतील अनियमितता, पेपर फुटीचे सत्र आणि राज्यातील वाढती बेरोजगारी याविरोधात बिहारमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ऑल बिहार स्टुडंट्स युनियनच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी मंगळवारी पाटणा येथे जोरदार निदर्शने केली. आंदोलक विद्यार्थ्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून थेट मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या निवास्थानाकडे तसेच राजभवनाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा मारा केला. तसेच गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्जही केला.

बिहारमधील शिक्षण पद्धतीतील सातत्याने समोर येणारे घोटाळे आणि स्पर्धा परीक्षांचे फुटणारे पेपर यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. 70 वी बीपीएससी परीक्षा रद्द करण्यात यावी आणि पारदर्शक पद्धतीने नव्याने प्रक्रिया राबवली जावी, अशी मुख्य मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. याशिवाय ग्रंथपाल भरती मागील 18 वर्षांपासून प्रलंबित असल्याचा मुद्दाही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. या सर्व मागण्यांसह विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

गांधी मैदानापासून सुरू झालेला मोर्चा मुख्यमंत्री निवासस्थानाकडे निघाला होता. पोलिसांनी गांधी मैदान ते मुख्यमंत्री निवासाच्या मार्गावर कडक बंदोबस्त आणि बॅरिकेडिंग केले होते. मात्र, आक्रमक झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी पाण्याचा मारा केला, तसेच लाठीचार्ज करत गर्दी पांगवली. या धुमश्चक्रीत काही विद्यार्थी जखमी झाले असून पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

विद्यार्थ्यांची तुलना कुत्र्यांसोबत केली

दरम्यान, या आंदोलनादरम्यान एका घटनेमुळे विद्यार्थ्यांचा राग आणखी अनावर झाला. बिहार लोकसेवा आयोगाचे अधिकारी राजेश कुमार सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची तुलना थेट कुत्र्यांशी केली. ज्यांना अडचण आहे ते न्यायालयात का जात नाहीत? आयोगाच्या बाबतीत मला ती म्हण आठवते, हाथी चले बाजार कुत्ते भौंके हजार, असे विधान सिंह यांनी केले. या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि सोमवारी सदर अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला.