माझगावमध्ये बाप्पाच्या आगमनावेळी मिरवणुकीवर अंडी फेकल्याने संताप; पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझगावमध्ये गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा संतापजननक प्रकार रविवारी घडला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारानंतर माझगावच्या मोरया गणेशोत्सव मंडळाने दिलेल्या तक्रारीनंतर भायखळा पोलिसांनी ‘बीएनएस’च्या कलम 299, 196 अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भायखळा पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाकडून कसून तपास करण्यात येत आहे.

रविवारी माझगावच्या मोरया गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचा आगमन सोहळा मोठय़ा उत्साहात सुरू होता. या वेळी मंडपाजवळ अचानक अंडी फेकण्याचा प्रकार घडल्यामुळे भाविकांच्या संतापाचा भडका उडाला. या घटनेचा निषेध करत हे पृत्य करणाऱ्याला समोर आणा, अशी मागणी करत कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त करण्यात आला. मंडपाच्या समोरच्या फुटपाथला लागून काँटिनन्टल हाईट्स नावाचा बहुमजली टॉवर आहे. त्या टॉवरमधून अंडी फेकण्यात आल्याचे म्हटले जात आहे. हा प्रकार कळताच भायखळा पोलीस तसेच वरिष्ठ अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या घटनेमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांचा संताप वाढला होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत माझगाव परिसरात तणावाचे वातावरण होते.

मंडप परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त

अंडी पुठून आली, ती कोणी फेकून मारली याचा आम्ही सर्व अंगाने शोध घेत आहोत. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकाला शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू, गुन्हा करणाऱ्याला सोडणार नाही, असे भायखळा पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर आता माझगाव परिसरात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता गणपतीच्या मंडप परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.