
जय महाराष्ट्र… सांगा कुठे जायचे? रिक्षा उजवीकडे घ्यायची की डावीकडे? आणि हो… सुट्टे पैसे आहेत का? असे शब्द ठाण्यातील परप्रांतीय रिक्षाचालकांच्या मुखातून निघत आहेत. मायबोलीचे हे बोल सध्या ऐकू येत असून रिक्षांमध्ये मराठीचा मीटर पडू लागला आहे. मात्र मराठी भाषेत प्रवाशांशी संवाद न साधणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात आरटीओने विशेष मोहीम सुरू केली असून कारवाईचा बडगाही उगारला जात आहे. त्यामुळे मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहे.
ठाणे शहरातील एकूण रिक्षाचालकांची संख्या अंदाजे ५० ते ६० हजारांच्या दरम्यान आहे. गेल्या तीन दिवसांत १ हजार १८३ वाहनांची तपासणी करण्यात आली असून ८९ चालकांना मराठी येत नसल्याने त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली. मराठी शिकणे हा केवळ नियम नसून प्रवाशांशी सुलभ संवाद साधण्याचा मार्ग आहे, याबाबतही या मोहिमेतून जनजागृती करण्यात येत आहे.
केवल नियम म्हणून पाहू नका
मराठी शिकणे, महाराष्ट्राशी जोडले जाने हाच हेतू परिवहन विभागाचा आहे. परराज्यांतून रोजगारासाठी महाराष्ट्रात आलेल्या चालकांनी मराठी शिकण्याकडे केवळ नियम म्हणून पाहू नये. महाराष्ट्राच्या समाजजीवनाशी जोडणारे ते एक सशक्त माध्यम असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी सांगितले.
-
ठाण्याच्या परिवहन विभागाने ठाणे रेल्वे स्थानक परिसर, खोपट, माजिवडा, वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा या महत्त्वाच्या ठिकाणी भरारी पथकांद्वारे तपासणी सुरूच आहे.
-
मराठी बोलण्यावरून भाईंदरमध्ये वाद चांगलाच चिघळला आहे. याप्रकरणी म्हाडा वसाहत परिसरात काही रिक्षाचालकांनी आंदोलन केले. रिक्षा रस्त्यावर उभ्या केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. आंदोलनाची दखल घेत मीरा-भाईंदर प्रादेशिक परिवहन विभागाने २५ रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली आहे. चालकांना ७ हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे.
“मी गेली १५ वर्ष ठाणे शहरात प्रामाणिकपणे रिक्षाचा व्यवसाय करतो. परिवहन विभागाने सक्तीच्या केलेल्या मराठी भाषेला माझा पाठिंबा आहे. मला बरीच वर्षे झाली असल्याने प्रवाशांशी शुद्ध मराठीतच बोलतो.”— मनोज गुप्ता (रिक्षाचालक)
“मी परप्रांतीय असलो तरी महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी ही आलीच पाहिजे अशी माझी भूमिका आहे. हळूहळू मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. मराठी भाषा बोलताना एकदम गूड वाटते. प्रवासीही मराठीच बोलू लागल्याने आम्ही मराठीतूनच संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.”
— रविंद्र यादव (रिक्षाचालक)



























































