विषारी फळांची विक्री; अमेझॉन, स्विगी इन्स्टामार्ट आणि बिगबास्केटचे अन्न परवाने निलंबित, कर्नाटमध्ये FDA ची मोठी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने एक मोठी आणि धडक कारवाई करत ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपन्या असलेल्या अमेझॉन, स्विगी इन्स्टामार्टआणि बिगबास्केट यांचे अन्न परवाने पुढील आदेशापर्यंत तातडीने निलंबित केले आहेत. मानवी आरोग्यास अत्यंत घातक आणि विषारी मानल्या जाणाऱ्या धोत्रा फळांची आणि बियांची खाद्यपदार्थ म्हणून ऑनलाईन विक्री केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने ही कडक पावले उचलण्यात आली आहेत.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केलेल्या तपासणीदरम्यान या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर धोत्रा हे फळ आणि त्याच्या बिया मानवी वापरासाठी व खाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे आढळून आले. इतकेच नव्हे तर, यातील काही पाकिटांवर एफएसएसएआयचा परवाना किंवा नोंदणी क्रमांकही छापण्यात आला होता.

धोत्रा हे अत्यंत विषारी असून त्याचे सेवन मानवी आरोग्यासाठी आणि जिवासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते. त्यामुळे प्रशासनाने या तिन्ही प्लॅटफॉर्म्सना धोत्रा फळांच्या विक्रीसंबंधीच्या सर्व ऑनलाईन जाहिराती आणि लिस्टिंग तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, धोत्रा उत्पादनांचा पुरवठा करणाऱ्या विक्रेते आणि आस्थापनांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

न्यायालयात सुनावणी

दरम्यान, या प्रकरणासंदर्भात सोमवारी सर्व संबंधित ई-कॉमर्स कंपन्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. अमेझॉन कंपनीने या प्रकरणी अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद किंवा स्पष्टीकरण सादर केलेले नाही. तर स्विगी इन्स्टामार्टने धोत्र्याच्या विक्रीवर काय कारवाई केली याबाबत कोणतेही दस्तऐवज सादर केले नाहीत आणि उत्तर देण्यासाठी अतिरिक्त वेळेची मागणी केली. बिगबास्केटने धोत्रा फळे व बियांची ऑनलाईन विक्री पूर्णपणे थांबवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच भविष्यात विक्री पद्धतीत सुधारणा करून अशा उत्पादनांवर मानवी सेवनासाठी नाही असा स्पष्ट लेबल लावले जाईल, असे स्पष्ट केले.