
महिला पत्रकारावर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेले ‘तहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांना दोन आठवड्यांत पोलिसांसमोर शरण येण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ६ ऑगस्ट रोजी तेजपाल यांच्या निर्दोष सुटकेचा २०२१ मधील निर्णय रद्दबातल ठरवत त्यांना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाच्या या शिक्षेविरोधात ६३ वर्षीय तरुण तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे, तेजपाल यांच्या शिक्षेत आणखी वाढ करण्यात यावी, यासाठी गोवा सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केली आहे.
प्रथम शरण या, मगच याचिका ऐकू – सर्वोच्च न्यायालय
मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान गोवा सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार, शिक्षेविरोधात अपील करण्यापूर्वी आरोपीला पोलिसांसमोर शरण यावे लागते आणि त्याचे ‘सरेंडर प्रमाणपत्र’ सादर करावे लागते किंवा शरण येण्यापासून सूट देणारा अर्ज करावा लागतो, याकडे मेहता यांनी लक्ष वेधले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तेजपाल यांनी आधी शरण येणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काय आहे नेमके प्रकरण?
नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान एका पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपाल यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिला पत्रकाराने केला होता. याप्रकरणी ३० नोव्हेंबर २०१३ रोजी तेजपाल यांना अटक करण्यात आली होती.



























































