‘ब्रह्मास्त्र 2’मध्ये दीपिका पदुकोण नाही! अफवांना पूर्णविराम; अभिनेत्रीच्या प्रवक्त्याने केले स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’च्या दुसऱ्या भागाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, या चित्रपटात दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू होत्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दीपिका पदुकोण ‘ब्रह्मास्त्र 2’चा भाग नसल्याचे तिच्या अधिकृत प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. दीपिकाच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनानुसार, ‘ब्रह्मास्त्र 2’मध्ये काम करणार असल्याच्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे सांगण्यात आले आहे.

‘ब्रह्मास्त्र पार्ट वन : शिवा’मध्ये रणबीर कपूरने शिवाची, तर आलिया भट्टने ईशाची भूमिका साकारली होती. शिवाला आपल्यात असलेल्या विशेष शक्तींची जाणीव झाल्यानंतर तो ईशासोबत या शक्तींच्या मूळाचा शोध घेण्याच्या प्रवासाला निघतो. 9 सप्टेंबर 2022 ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय आणि शाहरुख खान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. मोठ्या बजेटमध्ये तयार झालेल्या या फँटसी-अॅडव्हेंचर चित्रपटाने जगभरात 400 कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचे सांगितले जाते.

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार याआधी 2023 मध्ये रणबीर कपूरने ‘ब्रह्मास्त्र 2’च्या लेखनाचे काम सुरू असल्याचे सांगितले होते. अयान मुखर्जीने त्याला सिक्वेलची कथा ऐकवली असून ती पहिल्या भागापेक्षा तब्बल दहापट मोठी संकल्पना असल्याचे रणबीरने सांगितले होते. ‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या भागावर झालेल्या टीकेचाही टीमने गांभीर्याने विचार केल्याचे रणबीरने म्हटले होते. संवाद, पात्रांची मांडणी तसेच शिवा आणि ईशाच्या केमिस्ट्रीबाबत प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून, पुढील भाग अधिक चांगला करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्याने स्पष्ट केले होते.