विद्यार्थी आंदोलनातून चर्चेत आलेली रिया अहिर आता ‘बिग बॉस 20’मध्ये? चाहत्यांच्या मतांवर ठरणार निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

‘बिग बॉस 20’च्या प्रीमियरची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी संभाव्य स्पर्धकांच्या नावांबाबतची उत्सुकता अधिकाधिक वाढताना दिसत आहे. यंदाच्या सीझनमध्ये सोशल मीडियावर चर्चेत आलेली मॉडेल रिया अहिर सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, तिचा बिग बॉसच्या घरातील प्रवेश थेट निश्चित झालेला नसून, त्यासाठी चाहत्यांच्या मतदानाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

‘बिग बॉस 20’चा प्रीमियर 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. या सीझनमध्ये पुन्हा एकदा ‘फॅन्स का फैसला’ ही संकल्पना पाहायला मिळणार आहे. त्यानुसार रिया अहिर आणि पंजाबी अभिनेत्री-मॉडेल लव्ह गिल यांच्यापैकी एका स्पर्धकाची निवड करण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दोघींमध्ये ज्याला सर्वाधिक मते मिळतील, तिलाच ‘बिग बॉस 20’च्या घरात अधिकृत स्पर्धक म्हणून प्रवेश मिळणार आहे.

रिया अहिर ही 27 वर्षीय मॉडेल असून, काही काळापूर्वी विद्यार्थी आंदोलनादरम्यान ती चर्चेत आली होती. ‘नीट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपावरून मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांना पोलीस घेऊन जात असताना तिने पोलिसांच्या वाहनाचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला होता. तिचे हे दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

रिया सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे 3.24 लाख फॉलोअर्स आहेत. तिने काही म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले आहे. ‘बिग बॉस 20’च्या प्रोमोमध्ये सलमान खानने ‘फॅन्स का फैसला’ ही संकल्पना पुन्हा आणल्याचे दिसते. ‘बिग बॉस 19’मध्येही अशाच प्रकारे प्रेक्षकांना दोन नावांपैकी एका स्पर्धकाची निवड करण्याची संधी देण्यात आली होती. यावेळी रिया अहिर आणि लव्ह गिल यांच्यात थेट सामना होणार आहे.

प्रेक्षक ‘जिओहॉटस्टार’ ॲपवर आपल्या आवडत्या स्पर्धकासाठी मतदान करू शकतात. त्यामुळे रियाला बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळणार की लव्ह गिल बाजी मारणार, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ‘बिग बॉस 20’मध्ये निया शर्मा, अर्जुन बिजलानी, करण पटेल आणि जन्नत जुबेर यांसारख्या नावांचीही चर्चा आहे. मात्र, अंतिम स्पर्धकांची अधिकृत यादी प्रीमियरच्या जवळ स्पष्ट होण्याची शक्यता आहे.