
मध्य प्रदेशातील सिंगरौलीचे भाजप आमदार रामनिवास शाह यांची खासगी कार धुण्यासाठी चक्क सरकारी अग्निशमन दलाच्या बंबाचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यावरून शाह यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान प्रसारमाध्यमांनी शाह यांना याबाबत विचारले असता त्यांनी ”आमदार स्वत:ची कार स्वत: धुणार का?” असा उलट सवाल केला.
मध्य प्रदेशातील सिंगरौलीचे भाजप आमदार रामनिवास शाह यांची खासगी कार धुण्यासाठी चक्क सरकारी अग्निशमन दलाच्या बंबाचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. pic.twitter.com/cFqMH0Tlj7
— Saamana Online (@SaamanaOnline) August 26, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ सिंगरौली विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार रामनिवास शाह यांच्या बिलौंजी येथील शासकीय निवासस्थानाबाहेरचा आहे. व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाची कार आमदारांच्या बंगल्याबाहेर उभे असल्याचे दिसत असून, तीन कर्मचारी मोठ्या पाईपच्या साहाय्याने त्यांची पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार धुताना दिसत आहेत.
आपत्कालीन परिस्थिती आणि आग विझवण्यासाठी राखीव असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचा वापर अशा प्रकारे खासगी कार धुण्यासाठी का आणि कोणाच्या आदेशावरून करण्यात आला? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


























































