
सरकारी कंत्राटदार गजानन देवकाते यांनी थकीत बिलांमुळे आलेल्या आर्थिक आणि मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसेच या प्रकरणी सरकारवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? असा संतप्त सवाल केला आहे.
रोहित पवार यांनी एक ट्विट करत कंत्राटदाराच्या आत्महत्येवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. ”गुजरात आणि आंध्र प्रदेशातील ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिलं तातडीने अदा केली जातात मग मराठी कंत्राटदारांनी सरकारचं काय घोडं मारलंय? असा सवाल त्यांनी या पोस्ट मधून केला. तसेच संविधानिक मार्गाने मागणी केली तरी सरकार कंत्राटदारांची बिलं देत नाही. त्यामुळं आत्महत्या करण्यास भाग पाडलं म्हणून या सरकारवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करु नये? असा सवाल देखील त्यांनी या पोस्टमधून केला आहे.
या पोस्टमधून त्यांनी कंत्राटदारांना आत्महत्या न करण्याची विनंती केली आहे. ”माझी सर्व मराठी कंत्राटदारांना विनंती आहे की, आत्महत्या हा आपला मार्ग नाही. आपल्याला आपल्या हक्कांसाठी, कुटुंबासाठी आणि अस्तित्त्वासाठी एकत्रित येऊन मोठा लढा उभारावा लागेल. संघर्षाच्या मार्गाने या सरकारला आपण वठणीवर आणू, पण कृपया कुणीही आत्महत्या करु नये. गजानन देवकाते यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत”, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.


























































