
गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून आरोपी आणि मुलीची ओळख झाली असल्याची माहिती आहे. वलसाडमधील प्रसिद्ध साई बाबा मंदिराच्या परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई केली असून तीनही अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची दोन वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर एका अल्पवयीन मुलाशी ओळख झाली होती. 23 ऑगस्टच्या रात्री त्या मुलाने पीडित मुलीला साई बाबा मंदिराजवळ बोलावले. पीडिता जेव्हा तेथे पोहोचली तेव्हा तो मुलगा त्याच्या दुसऱ्या मित्रासह उपस्थित होता. त्यानंतर तिघांनी मिळून मुलीला मंदिरामागील एका निर्जन भागात नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला आणि तिला तिथेच सोडून पळ काढला.
पीडित मुलगी बराच वेळ घरी न परतल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. बऱ्याच वेळ शोधाशोध केल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ती वाडी परिसरात सापडली. कुटुंबीयांनी विचारणा केल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या आईने तात्काळ वलसाड शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच तिन्ही अल्पवयीन संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यासह इतर संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

























































