
मुंबईतील कचऱ्याच्या समस्येवरून उच्च न्यायालयाने आज पालिकेला सुनावले. मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर पालिकेने एफडीएच्या धर्तीवर काम करायला हवे, असे फटकारत लोकांना कचरा करण्यासाठी जागा मोकळ्या ठेवू नका. तर त्या ठिकाणी सुशोभीकरण करणे आवश्यक असल्याचे सांगत हायकोर्टाने कचऱ्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका, असे पालिका अधिकाऱ्यांना बजावले.
कांजूर डम्पिंग ग्राऊंडमुळे होणारे वायू प्रदूषण व इतर त्रासाबाबत कन्नमवारनगर येथील रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. अभिजित राणे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर आज गुरुवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती निला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांच्या वतीने खंडपीठाला सांगण्यात आले की, डम्पिंग ग्राऊंडवर वॉच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही पॅमेरा बसवला आहे, पण त्यात चिप नाही. त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. नॅशनल ऑम्बिट एअर क्वालिटी गाईडलाईन्स नोटिफिकेशन 2019 नुसार, रासायनिक पदार्थ पीएम 2.5 ची 3 तासांच्या देखरेखीसाठी सर्वोच्च मर्यादा 12.5 आहे, परंतु पालिकेने सादर केलेल्या अहवालानुसार 3 तासांत हे प्रमाण 15 ते 24 पेक्षा जास्त असल्याचे दिसून येते.
पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, मुंबईतील कचरा व्यवस्थापनाबद्दल पालिका प्रशासन अतिशय गंभीर असून त्याबाबत सर्वतोपरी उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रत्येक प्रभागातील स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या जबाबदारीत वॉर्डातील सर्वोच्च अधिकाऱ्यासह तिथल्या नगरसेवकांनाही सामावून घेण्यात आले आहे. कारण जनतेतून निवडून आलेले असल्याने त्यांचा थेट लोकांशी संपर्क असतो. मुंबईत रात्रीच्या वेळी हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या बाहेरून मोठय़ा प्रमाणात कचरा गोळा केला जातो. तसेच रहिवासी सोसायटय़ांमधून सकाळच्या वेळीच हे काम केले जाते. त्यानंतर दिवसभरात हा घनकचरा बंद गाडय़ांमध्ये भरून शास्त्राsक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राऊंडवर नेला जातो. रस्त्यांवर तसेच मोकळ्या जागांवर कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेचे फिरते अधिकारी तसेच वॉर्डातील सीसी टीव्हीच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाते. प्रसंगी वारंवार कचरा फेकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईही केली जाते, अशी माहिती देत त्याची तपशीलवार आकडेवारी पालिकेच्यावतीने सादर करण्यात आली. त्यावर हायकोर्टाने समाधान व्यक्त केले.
न्यायालय काय म्हणाले?
– सण-उत्सव स्वच्छतेचे भान राखून साजरे केले तरच त्यांचे खरे महत्त्व कळेल.
– कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पर्यायी व्यवस्था अर्थात ‘बॅकअप प्लॅन’ तयार करा.
– कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आहे.
– महानगरातील सर्वाधिक स्वच्छ वॉर्डातील नगरसेवक आणि वॉर्ड अधिकाऱ्यांचा पालिकेने गौरव केला पाहिजे तसेच लोकांच्या सहभागाशिवाय मुंबई स्वच्छ ठेवणे शक्य नाही.

























































