
>> गणेश कदम
सटायर फटायर’ या पुस्तकाची गंमत त्याच्या नावापासूनच सुरू होते. हे पुस्तक म्हणजे ‘सटर फटर’ गोष्टींवरचं चिंतन आहे, असं लेखक मनोगतात म्हणतात. पण गोष्टी ‘सटर फटर’ असल्या तरी त्यामागचं चिंतन प्रगल्भ आणि खोल आहे. त्यामुळं ‘सटर फटर’ समजून पुस्तकाकडं दुर्लक्ष कराल तर एका वेगळ्या अनुभवास मुकाल.
नाटककार शफाअत खान यांनी 14 वर्षांपूर्वी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. लेख जुने असले तरी ते कालबाह्य नाहीत. आशय आणि विषयामुळे ते आजच्या काळातही तितकेच लागू पडतात हे विशेष.
लेखसंग्रहाच्या पुस्तकाचा फायदा असा असतो की, ाढम पाळण्याची गरज नसते. कुठलाही लेख उचलून वाचता येतो. ‘सटायर फटायर’मध्येही ती सोय आहे. मात्र अपामणिकेवर नजर टाकली की अशी उडी मारायची गरज भासत नाही. बेडूक वर्ष, चिल्लरांचा काळ, शांतीसाठी राडा, प्रॉब्लेम्स… देशी कुत्र्यांचे, उलटय़ा पायाची भली भुतं, या कंटाळ्याचं काय करावं ही शीर्षकं वाचली तरी उत्सुकता चाळवते आणि शीर्षकं वाचून एकदा का वाचायला सुरुवात केली की, लेख कधी संपतो तेही कळत नाही. जेन झीच्या भाषेत सांगायचं तर शफाअत खान यांच्या लेखांची शीर्षकं ही वाचकाला खेचून घेणारी ‘रील’ आहे, तर त्यातील उपरोधामागचे भाष्य आणि लेखनाची वैचारिक खोली हा एक प्रगल्भ पॉडकास्ट आहे.
शफाअत खान यांना ओळखणाऱयांना त्यांच्या उपरोधिक व मार्मिक शैलीविषयी वेगळे सांगण्याची गरज नाही. ‘मुंबईचे कावळे’, ‘शोभायात्रा’, ‘पोपटपंची’, ‘भूमितीचा फार्स’ अशी अनेक नाटके त्याबद्दल सांगण्यास पुरेसी आहेत. अर्थात, त्यांच्या उपरोधाला उथळपणाचा स्पर्श नसतो. खिल्ली उडवणे हा त्यांच्या लेखनाचा हेतू नसतो. या पुस्तकातील लेखांचेही तसेच आहे. प्रत्येक लेख हा स्वतंत्र विधान करतो. लहान-लहान प्रसंगातून मोठे सामाजिक वास्तव उलगडून सांगण्याचे त्यांचे कौशल्य यात दिसते. व्यवस्थेला थेट प्रश्न विचारणे काहीसे जिकिरीचे असतानाच्या काळात असे पुस्तक येणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
शफाअत खान यांचे व्यंग हे व्यक्तीवर नसून प्रवृत्तीवर, परिस्थितीवर, जगण्यातील विसंगतीवर आहे. त्यामुळं ती टीका वाटत नाही. उदा. अडाण्यांचा कॉन्फिडन्स घाबरवून टाकणारा आहे… किंवा विमानात मला एक गृहस्थ भेटले, ते आपल्या मुलाबाळांवर संस्कार करण्यासाठी सतत अमेरिकेला जात असतात… ही त्यांची वाक्ये जितकी हसवतात, तितकीच अंतर्मुख करून सोडतात.
भारतातही सरकारी नोकरांना वरकमाई व्हावी म्हणून काही नियम केलेले आहेत… किंवा पूर्वी माणसं शेजाऱयांना ओळखत… यातून ते जळजळीत वास्तव मांडतात.
ओळख असू द्या… या लेखात भारतात ओळखीला असलेलं महत्त्व लेखकानं नेमकेपणानं सांगितलं आहे. माझे एक नातेवाईक सरकारी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. ओळख नसल्यामुळे ते अचानक गेले. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर प्रकाश टाकण्यासाठी याच्याइतकं भेदक वाक्य दुसरं असूच शकत नाही. शफाअत खान याचा हा उपरोध व उपहास बेचैन करणारा आहे.
एकूण 25 लेखांचा हा संग्रह वाचकाला समृद्ध करणारा आहे. वर्तमानपत्र हे घाईतलं साहित्य आहे असं म्हटलं जातं. ते जितक्या घाईत निर्माण केलं जातं, तितक्याच घाईत बाजूला ठेवलं जातं. मात्र त्यातला सगळाच मजकूर कालबाह्य नसतो. ‘सटायर फटायर’चा मजकूर याच प्रकारातला आहे. तो पुस्तक स्वरुपात येणं अत्यंत आवश्यक होतं. लोकवाङ्मय गृहाने हे अत्यंत महत्त्वाचं काम नेटकेपणानं केलं आहे.
सटायर फटायर
लेखक : शफाअत खान
प्रकाशन : लोकवाङ्मय गृह
पृष्ठे : 148 ह किंमत : 400/-


























































