
‘शुद्धीकरण हा अस्पृश्यतेचाच एक प्रकार आहे आणि अस्पृश्यता हा संविधानानुसार गुन्हा आहे. भाजप, आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेच्या जागेचे शुद्धीकरण करून हा गुन्हा केला आहे. या लोकांवर अॅट्रॉसिटी कायद्याखाली लवकरात लवकर गुन्हा दाखल करा. पंतप्रधान मोदी यांनी तसे आदेश द्यावेत,’ अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली.
नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे यांनी 8 ऑगस्ट रोजी उत्तराखंडच्या हलद्वानी येथील रामलीला मैदानावर सभा घेतली होती. या सभेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी शुद्धीकरण व होमहवन केले. उत्तराखंड भाजपचे अध्यक्ष महेंद्र भट्ट यांनी या कृत्याचे समर्थनही केले. त्यावरून राहुल यांनी भाजपवर निशाणा साधला.
‘उत्तराखंडमध्ये जे झाले, तो एसएसटी कायद्यानुसार गुन्हा आहे. खरगे यांच्यावर अन्याय झाला आहे. या घटनेला 20 दिवस उलटल्यानंतरही कोणतीही कारवाई झालेली नाही. यातून भाजपची दलितविरोधी मानसिकता दिसून येते. आम्ही हे खपवून घेणार नाही. खरगे यांना न्याय देण्याची जबाबदारी राज्य सरकारची व केंद्र सरकारची आहे,’ असे राहुल यांनी ठणकावले.
ही लढाई भाजप–आरएसएस विरुद्ध संविधान
‘दलितांच्या अपमानाचा मुद्दा केवळ खरगेंपुरता मर्यादित नाही. देशभरात आजही दलितांवर अत्याचार सुरू आहेत. शाळांमध्ये, गावच्या विहिरीवर, चहाच्या दुकानात आजही दलितांशी भेदभाव केला जातो. लग्नात घोडय़ावर बसले म्हणून मारहाण होते. विषमता आणि भेदभावाला प्रोत्साहन देणाऱया भाजप-आरएसएसच्या विचारधारेमुळे हे होत आहे. दलितांनी प्रगती करावी आणि सन्मानाने जगावे असे आरएसएसला वाटतच नाही. आमची लढाई याच विचारधारेच्या विरोधात आहे. भाजप-आरएसएसची विचारधारा आणि संविधानाची विचारधारा अशी ही लढाई आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
























































