
पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात शनिवारी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत आम आदमी पक्षाचे (AAP) कार्यकर्ते 45 वर्षीय गुरप्रीत सिंग उर्फ गोपी यांचा मृत्यू झाला. तर 22 वर्षीय हरप्रीत सिंग उर्फ हॅप्पी जखमी झाला. चार अज्ञात हल्लेखोर कारमधून आले आणि त्यांनी हा गोळीबार केला. या हल्ल्यात नवनिर्वाचित नगर पंचायत अध्यक्ष आणि आप नेते विक्की मैनी यांच्या कारलाही गोळ्या लागल्या. मात्र मैनी हल्ल्यातून बचावल्याची माहिती आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, गुरप्रीत आणि हरप्रीत हे विक्की मैनी यांच्यासोबत मोटारसायकलवरून घरी जात होते. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. आरोपींनी सहा ते सात गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर गुरप्रीत यांना फिरोजपूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हरप्रीत यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी लुधियानामध्यील एका रूग्णालयात नेण्यात आले आहे.
गोळीबार सुरू झाल्यानंतर विक्की मैनी यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी कारमधून बाहेर पडून जवळच्या दुकानात आश्रय घेतला. पोलिसांच्या माहितीनुसार, हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला असण्याची शक्यता आहे. या वादाचा संबंध नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीशी असल्याचा संशय आहे. फिरोजपूरचे एसएसपी भूपिंदर सिंग यांनी आरोपींची ओळख पटल्याचे सांगितले असून, त्यांना पकडण्यासाठी आठ पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत.
पोलिसांनी या घटनेत गँगस्टरचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. गोळीबारानंतर मामदोट परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून छापेमारी सुरू आहे.






















































