
परदेशातील आयुष्य म्हणजे प्रत्येक बाबतीत अधिक चांगले आणि सर्व सुविधा सहज उपलब्ध असतात, असा अनेकांचा समज असतो. मात्र हिंदुस्थानातील एका डॉक्टरला परदेशात आलेल्या अनुभवातून या समजुतीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आली. पतीची अचानक प्रकृती बिघडल्यानंतर रात्रीच्या वेळी औषधांसाठी बाहेर पडताना हिंदुस्थानात सहज उपलब्ध असलेल्या काही आरोग्यविषयक सुविधांची त्यांना नव्याने जाणीव झाली.
इंडिया टुडेनुसार, दिपांजली शर्मा असे या डॉक्टरचे नाव आहे. दिपांजली यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपला अनुभव सांगितला आहे. त्यांचे पतीदेखील डॉक्टर असून, एके दिवशी त्यांची अचानक प्रकृती खालावली. सुरुवातीला डोकेदुखीचा त्रास झाला आणि त्यानंतर त्यांना वारंवार उलट्या होऊ लागल्या. परिस्थिती लक्षात घेऊन रात्री सुमारे १० वाजता दिपांजली औषधे आणि IV इंजेक्शन घेण्यासाठी घराबाहेर पडल्या. याच वेळी हिंदुस्थानात आरोग्यव्यवस्थेत उपलब्ध असलेल्या काही सुविधांची त्यांना प्रकर्षाने जाणीव झाली. रात्री उशिराची वेळ असूनही औषधे आणि आवश्यक वैद्यकीय साहित्य मिळवून काही वेळात घरी परतणे येथे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
View this post on Instagram
ब्रिटन किंवा इतर पाश्चात्त्य देशांमध्ये अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागले असते, तर तातडीची वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागली असती, असे दिपांजली यांनी म्हटले. डॉक्टरांची उपलब्धता, आपत्कालीन विभागातील गर्दी आणि औषधांची उपलब्धता या मुद्द्यांवर त्यांनी इंडिया आणि पाश्चात्त्य देशांमधील आपल्या अनुभवांची तुलना केली.
मात्र, हिंदुस्थानातील आरोग्यव्यवस्था परिपूर्ण असल्याचा दावा दिपांजली यांनी केलेला नाही. देशातील आरोग्यसेवेत अद्याप अनेक सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंदुस्थानातही प्रत्येक व्यक्तीला समान आणि सहज आरोग्यसेवा मिळतेच, असे नाही, असेही त्यांनी नमूद केले. याचप्रकारे, परदेशात गेल्यानंतर जीवनातील प्रत्येक बाबतीत सर्व सुविधा सहज उपलब्ध होतीलच असे नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विशेषतः आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक गोष्ट अपेक्षेप्रमाणे तातडीने उपलब्ध होईलच असे नाही, असा त्यांचा अनुभव आहे.
दिपांजली यांच्या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर या विषयावर चर्चा सुरू झाली. अनेकांनी हिंदुस्थानातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या औषधांच्या दुकानांपासून ते डॉक्टर आणि औषधांच्या तुलनेने सहज उपलब्धतेपर्यंतच्या सुविधांकडे लक्ष वेधले. काहींनी मात्र प्रिस्क्रिप्शनवरील औषधांची सहज उपलब्धता आणि आरोग्यव्यवस्थेतील नियमनाबाबत प्रश्न उपस्थित केले.























































