भरधाव एक्सप्रेस, लाल सुटकेस अन् मृतदेहाचे तुकडे… महिलेच्या हत्येचं गूढ उकललं; दाम्पत्याला मणिपूरमधून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडू एक्सप्रेसमध्ये लाल रंगाच्या सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या शरीराच्या अवयवांचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी मणिपूर आणि तामिळनाडू पोलिसांच्या संयुक्त पथकाने मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यातून जोडप्याला अटक केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना गेल्या 24 दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये शोध घेत होते.

नवभारत टईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 5 ऑगस्ट रोजी तामिळनाडू एक्सप्रेस आग्रा कॅन्ट स्टेशनवर पोहोचल्यानंतर, प्रवाशांनी अनारक्षित डब्यातील एका बेवारस लाल रंगाच्या सुटकेसमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. जीआरपीने सुटकेस उघडून पाहिले असता आत महिलेचे डोके आणि शरीराचे तुकडे आढळले होते.

पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला. उत्तर प्रदेशात सुरु झालेला तपास तामिळनाडूपर्यंत पोहचला. तामिळनाडू पोलिसांनी चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजमध्ये एक पुरुष आणि एक महिला लाल रंगाच्या सुटकेससह तामिळनाडू एक्सप्रेसमध्ये चढताना दिसले.

पोलिसांनी शोधमोहीम राबवत आरोपींना शोधून काढले. माणिक उद्दीन लस्कर आणि भगवती माझी अशी आरोपीची नावे असून ते मूळचे आसाममधील रहिवासी आहेत. हे जोडपे चेन्नईतील गुडुवंचेरी येथे भाड्याच्या घरात राहत होते. झडतीदरम्यान, पोलिसांनी बिर्याणी बनवण्याच्या भांड्यातून मानवी शरीराचे आणखी छिन्नविछिन्न अवयव जप्त केले.

दरम्यान, आरोपी जोडपे मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यातील काशिमपुरा येथे लपून बसल्याचे पोलिसांना समजले. तामिळनाडू पोलिसांनी मणिपूर पोलिसांच्या सहकार्याने शनिवारी छापा टाकून आरोपींना अटक केली. पोलीस या गुन्ह्यामागील हेतूचा तपास करत आहेत.

न्यायवैद्यक चाचण्यांमध्ये पीडितेची ओळख ओडिशाची रहिवासी असलेली 38 वर्षीय हयातुन निशा अशी पटली. हयातुन निशा चेन्नईजवळील गुडुवंचेरी येथे राहत होती आणि एका खासगी कंपनीत काम करत होती. ती गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. स्थानिक पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. चौकशीनंतरच निशाच्या हत्येमागील हेतू स्पष्ट होईल.