
देशभरातील अनेक परीक्षा केंद्रांवर रविवारी नीट पीजी (NEET PG) परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र जयपूरमध्ये नीट परीक्षेत सावळा गोंधळ पहायला मिळाल. एका परीक्षा केंद्रावर वीजपुरवठाच खंडित झाल्यामुळे ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आली. आता परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जारी केलेल्या सूचनेनुसार, परीक्षा आता 5 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता घेण्यात येईल.
परीक्षा सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत नियोजित होती. तथापि, तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा सुरू होऊ शकली नाही. यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. या गोंधळानंतर एनटीएने त्यांना समाधानकारक प्रतिसाद दिला नाही, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. परीक्षा रद्द करण्यात आली आणि नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत, असे आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
वीजपुरवठा खंडीत झाल्याने जे उमेदवार रविवारी परीक्षेला उपस्थित राहिले नाहीत, ते 5 सप्टेंबर रोजी परीक्षेला बसतील. यासाठी प्रवेशपत्रे एनबीईएमएसच्या (NBEMS) अधिकृत वेबसाइटवर जारी केली जातील. ही परीक्षा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) द्वारे संगणक-आधारित पद्धतीने घेतली जाते.


























































