श्रीलंकेला यजमानपदाचा ‘चॅम्पियन्स’ धक्का, सरकारी लुडबुडीमुळे आयसीसीने यजमानपद हिसकावले; महिला चॅम्पियन्स ट्रॉफी आता हिंदुस्थानात?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेट बोर्डाच्या कारभारात सरकारी हस्तक्षेप करण्याची किंमत श्रीलंकेला आता चांगलीच मोजावी लागणार आहे. आयसीसीने 2027 मधील पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद श्रीलंकेकडून काढून घेतले आहे. 14 ते 28 फेब्रुवारीदरम्यान होणारी सहा संघांची टी-20 स्पर्धा आता हिंदुस्थानात खेळवली जाण्याची शक्यता आहे.

सरकारचा हस्तक्षेप; आयसीसीचा हुक्म

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा कारभार सध्या सरकारने नियुक्त केलेल्या ‘ट्रान्स्फॉर्मेशन कमिटी’च्या हातात आहे. मात्र क्रिकेट प्रशासनाने सरकारी हस्तक्षेपापासून स्वतंत्र राहणे हा आयसीसीच्या नियमांचा कणा आहे. त्यामुळे श्रीलंकेतील व्यवस्थेवर आयसीसीने नाराजी व्यक्त करत थेट यजमानपदावरच गदा आणली.

ट्रान्स्फॉर्मेशन कमिटीचे सचिव प्रकाश शाफ्टर यांनीही यजमानपद काढून घेतल्याच्या निर्णयाला दुजोरा दिला. स्पर्धेसाठी नवा यजमान अद्याप निश्चित झालेला नाही. आयसीसीच्या नियमानुसार सरकारी नियुक्त समिती नव्हे, तर निवडून आलेले क्रिकेट बोर्ड हवे.

यजमानपद गेले; आता श्रीलंकेचे स्थानही धोक्यात

यजमान असल्याने श्रीलंकेला महिला चॅम्पियन्स ट्रॉफीत थेट प्रवेश मिळणार होता. आता यजमानपदच हातातून गेल्याने श्रीलंकेच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्रीलंका महिला एकदिवसीय क्रमवारीत सहाव्या स्थानावर असली तरी यजमान बदलल्यानंतर पात्रतेचे निकष काय असतील, याबाबत आयसीसीने अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही.

जुना इशारा धुडकावला; आयसीसीने पुन्हा बजावले

सरकारी हस्तक्षेपाबाबत श्रीलंकेला आयसीसीने यापूर्वीही इशारे दिले आहेत. 2023 मध्ये श्रीलंका क्रिकेटचे सदस्यत्व निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर 2024 च्या पुरुषांच्या 19 वर्षांखालील विश्वचषकाचे यजमानपदही काढून दक्षिण आफ्रिकेला देण्यात आले. एप्रिल 2026 मध्ये सरकारने पुन्हा ट्रान्स्फॉर्मेशन कमिटीच्या हाती कारभार दिल्यानंतर आयसीसीने निर्वाचित बोर्डाची पुनर्स्थापना आणि निवडणुका घेण्याचा आग्रह धरला. मात्र परिस्थिती न बदलल्याने अखेर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदावरच आयसीसीने ‘हुक्म’ चालवला.