
नेपाळ आणि तिबेट महाभयंकर विनाशाला तोंड देत आहे. हा सगळ्या जगासाठी मोठा धडा आहे. अशातच उत्तराखंडमध्ये प्रशासकीय यंत्रणेचा दिरंगाईपणा नेपाळसारख्या मोठय़ा दुर्घटनेचे कारण ठरू शकतो. उत्तराखंड राज्यातील 426 हिमनदी तलावांपैकी (ग्लेशियर लेक्स) 13 तलाव अतिसंवेदनशील आहेत. मात्र त्यांच्यावर अर्ली वॉर्निंग सिस्टिम बसवण्याची योजना रेंगाळली आहे. वीज आणि दळणवळणाच्या अडचणींमुळे योजना रेंगाळली आहे.
उत्तराखंडच्या अतिसंवेदनशील तलावांमध्ये वसुधारा, माबोंग, स्यूनतियांकती आणि प्युंगरौ हे प्रमुख आहेत. या तलावांचे काठ फुटल्यास सखल भागात वसलेल्या प्रदेशात अचानक पूर येऊन मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते. हा धोका लक्षात घेऊन पेंद्र सरकारने इशारा यंत्रणेसाठी 30 कोटी रुपये मंजूर केले. त्यापैकी 8.10 कोटी रुपये वितरितही करण्यात आले आहेत. मात्र अद्याप एकाही तलावावर ही यंत्रणा कार्यान्वित होऊ शकलेली नाही.
प्रचंड उंचीवर या यंत्रणेला 24 तास वीज पुरवणे व माहिती पाठवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे, अशी माहिती वाडिया हिमालयन जिओलॉजीचे संचालक डॉ. विनीत गहलोत यांनी दिली.
वसुधारा तलावाचा धोका
धौलीगंगा खोऱ्याच्या उंचावरील भागात वसुधारा तलाव आहे. राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरनुसार, वसुधारा तलावापासून 18.6 किलोमीटर अंतरावरील नीती हे जवळचे गाव आहे. वसुधारापासून नीती गावापर्यंत नदीचा मार्ग तीव्र उताराचा व अरुंद आहे. त्यामुळे पुराचे पाणी व राडारोडा वेगाने खाली पोहोचू शकतो. यानंतर गमसाली, पैलाशपूर, मलारी व गोटिंग यांसारखी गावे येतात. पुढे हा प्रवाह जोशीमठच्या खालपर्यंत पोहोचतो.



























































