
आगामी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) या मित्रपक्षाने मान्यता दिली नाही, तर काँग्रेसचे दोन्ही मंत्री तमिळनाडू मंत्रिमंडळातून राजीनामा देतील, असा स्पष्ट इशारा पर्यटन मंत्री एस. राजेश कुमार यांनी दिला आहे. राहुल गांधी हेच देशाचे पुढील पंतप्रधान असतील, असा ठाम दावाही त्यांनी केला आहे. ‘तमिळनाडू टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांना टीव्हीके पक्षाचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्ते आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस मंत्री राजेश कुमार यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. जर टीव्हीकेने पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसच्या पाठीशी राहण्यास नकार दिला, तर ते आणि त्यांचे सहकारी पी. विश्वनाथन आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहेत, असे राजेश कुमार यांनी स्पष्ट केले.
तमिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके पक्षाने विजय मिळवला होता. मे महिन्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाले आणि विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काँग्रेसने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. नंतर मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसलाही स्थान देण्यात आले. मात्र आता पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आणि त्यांच्या जनता व तरुणांविरोधातील धोरणांविरुद्धच्या अथक लढ्यामुळे राहुल गांधी यांची लोकप्रियता समाजातील सर्व स्तरांमध्ये वाढत आहे. देशभरातील मतदारांनी आणि काँग्रेस पक्षाने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारले आहे, असेही राजेश कुमार यावेळी म्हणाले. तसेच काँग्रेस पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नाही, असा थेट इशारा दिला. ते कन्याकुमारी येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
Kanyakumari, Tamil Nadu Minister Rajesh Kumar says, “Rahul Gandhi will be the Prime Minister of India in 2029. If the Tamilaga Vettri Kazhagam (TVK) says it does not agree with this, the two Congress ministers in the TVK Cabinet will resign from their posts…” (30.08) pic.twitter.com/JGYDhrlZCf
— ANI (@ANI) August 31, 2026
दरम्यान, विजय सरकारमधील दुसरे मंत्री पी. विश्वनाथन यांच्याशी या संदर्भात संपर्क होऊ शकला नसला. मात्र राजेश कुमार यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि टीव्हीके यांच्यातील सत्ताधारी आघाडीत तणाव निर्माण होण्याची आणि मतभेद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


























































