No NRC Updation, No Census: मणिपूरमधील मशाल मोर्चाला हिंसक वळण; पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलनकर्ते जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ईशान्येकडील मणिपूरमध्ये जनगणनेपूर्वी ‘एनआरसी’ (राष्ट्रीय नागरिक नोंदणी) अपडेट करण्याची मागणी करणाऱ्या काकचिंग जिल्ह्यातील मशाल मोर्चाला हिंसक वळण लागले. यात काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, तर प्रत्युत्तरात पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या; ज्यामुळे काही आंदोलक जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

वाबागाई, हियांगलाम आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो गावकऱ्यांनी रविवारी रात्री मशाल मोर्चा आयोजित केला होता. या निषेध मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. यावेळी त्यांनी ‘एनआरसी नाही, तर जनगणना नाही’ अशा घोषणा दिल्या आणि अंतर्गत विस्थापित लोकांचे पुनर्वसन झाल्याशिवाय जनगणना करण्यास विरोध दर्शवला.

हा मोर्चा काकचिंग जिल्हा मुख्यालयाच्या दिशेने पुढे जात असताना, पोलिसांनी आंदोलकांना केइराक डॅम परिसरात अडवले आणि त्यांना मागे फिरण्यास सांगितले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यानंतर तणाव वाढून त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. दगडफेक सुरू झाल्यानंतर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या अनेक नळकांड्या फोडाव्या लागल्या. यामध्ये काही मोर्चातील सहभागी आंदोलनकर्त्यांना किरकोळ दुखापत झाली, असेही अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले.

मणिपूरमध्ये मे २०२३ पासून इंफाळ खोऱ्यातील मैतेई आणि लगतच्या डोंगराळ भागातील कुकी समुदायामध्ये सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारात आतापर्यंत २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत.