बुमराच्या पुनरागमनावर क्रिकेटविश्वाच्या नजरा, अफगाणविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियाला दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. हार्दिक पंड्या आणि नितीश कुमार रेड्डी पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचे वृत्त असून, वॉशिंग्टन सुंदरही पुनरागमनासाठी सज्ज होत आहे. मात्र, हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजीचा प्रमुख आधार असलेल्या जसप्रीत बुमराच्या पुनरागमनावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.

हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका 13 सप्टेंबरपासून नवी दिल्लीत सुरू होणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहेत. नितीश कुमार रेड्डीने बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जोरदार सराव सुरू केला असून, तो पूर्ण क्षमतेने सराव करत असल्याचे वृत्त आहे. हार्दिक पंडय़ानेही याच ठिकाणी तयारीला वेग दिला आहे.

बुमरावरच सगळ्यांच्या नजरा

हिंदुस्थानी संघाच्या निवडीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा जसप्रीत बुमराचा आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांना मुकला होता. सध्या बंगळुरूतील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याचे पुनर्वसन सुरू असून, त्याची प्रगती समाधानकारक असल्याचे वृत्त आहे.

सुंदरच्या कमबॅकला हिरवा कंदील?

वॉशिंग्टन सुंदरच्या पुनरागमनाच्याही आशा बळावल्या आहेत. चेन्नईत काही काळ घालवल्यानंतर तो या आठवडय़ात बंगळुरूत परतणार असून, तेथे त्याच्या फिटनेसची पुढील चाचणी होणार आहे.