
वसई तालुक्यात पकडलेल्या एक कोटींच्या बनावट नोटांचा सप्लायर वाडा तालुक्यातील प्रकाश शेलार हा असल्याचे आता उघड झाले आहे. तशी कबुली या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या प्रदीप पाटील या आरोपीने दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी फरारी झालेल्या प्रकाश शेलारचा कसून शोध सुरू केला आहे. प्रकाश शेलार याने बनावट नोटा आणखी किती ठिकाणी चलनात घुसवल्या आहेत, याचाही पोलीस तपास करीत आहेत.
वसई तालुक्यातील शिरसाड फाटा येथे १० ऑगस्ट रोजी बनावट नोटा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून प्रदीप पाटील या आरोपीला एक कोटींच्या बनावट नोटांसह अटक केली. याप्रकरणी अधिक तपास केला असता सदर नोटा या प्रकाश शेलार याने दिल्या असल्याची कबुली प्रदीप पाटील याने दिली आहे. याप्रकरणी प्रदीपच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.
अंगणवाड्यांच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप
प्रकाश शेलार हा वरसाळे गावचा माजी सरपंच असून त्याच्यावर या अगोदर अंगणवाड्यांचे निकृष्ट बांधकाम केल्याबद्दल भ्रष्टाचाराचे आरोपही झाले आहेत. प्रकाश शेलारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा बाजारात वितरित झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. प्रकाश शेलार याच्याकडे या बनावट नोटा कुठून आल्या याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. यापूर्वी वाडा शहरात बनावट नोटाप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा बनावट नोटा प्रकरणाचे धागेदोरे थेट वाड्यापर्यंत येऊन पोहचले आहेत.































































